‘हाय व्होल्टेज प्रेशर’चे तीन दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:55 AM2021-01-02T04:55:58+5:302021-01-02T04:55:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदस्य संख्येच्या जवळपास अडीचपट उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे ...

Three days of 'high voltage pressure'! | ‘हाय व्होल्टेज प्रेशर’चे तीन दिवस!

‘हाय व्होल्टेज प्रेशर’चे तीन दिवस!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदस्य संख्येच्या जवळपास अडीचपट उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे तीन दिवस उरले असताना, निवडणूक लागलेल्या गावांत ‘हाय व्होल्टेज प्रेशर’ पाहायला मिळत आहे. अर्ज माघारीसाठी साम, दाम, दंड या नीतीचा वापर केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया पार पडलेली आहे. ग्रामपंचायतींसाठी निवडून द्यायची सदस्य संख्या ७ हजार २६४ इतकी आहे. तब्बल १७ हजार ४०७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. आता सगळ्यांच्या नजरा ४ जानेवारी रोजी होणाऱ्या अर्ज माघारीकडे लागून राहिलेल्या आहेत. सध्याच्या घडीला अनेक ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे स्थानिक गट एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आहेत, तर वाई, कऱ्हाड, माण, सातारा, जावली या तालुक्यांमध्ये भाजपनेही ‘तेल लावलेले पैलवान’ रिंगणात उतरवले आहेत.

गावातील प्रस्थापित नेतेमंडळींशी बंड करूनही काही जण लढायला उभे ठाकले आहेत. यामध्ये शेतकरी संघटना, शिवसेना या पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा समावेश आहे. काही झाले तरी कुठल्याही भूलथापा अथवा आमिषांना बळी न पडता निवडणुकीला निर्धाराने सामोरे जाणारे अपक्ष उमेदवारही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसते. आता सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली आहे ती ४ जानेवारीची!

चौकट..

भावकीतल्या वादाला फुटले तोंड

गावा-गावांत असलेल्या भावकीच्या वादाला ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तोंड फुटलेय. या निवडणुकीत बांधावरून भांडणारे सख्खे भाऊ आता निवडणुकीच्या रणांगणात एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. इतर वेळी दोन भावांच्या भांडणात तेल ओतणारेच आता त्यांना सबुरीचा सल्ला देताना दिसत आहेत.

चौकट...

काही गावांत बिनविरोधसाठी पुढाकार

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर काही ग्रामपंचायतींमध्ये एखाद्‌दुसऱ्या जागेसाठी निवडणूक लागलेली आहे. तिथेही बिनविरोधचे प्रयत्न सुरू आहेत. भुरकवडी, नागाचे कुमठे, गाळेवाडी, गणेशवाडी, येरळवाडी, गारवडी, कणसेवाडी, गुंडेवाडी, पेडगाव (खटाव), या ग्रामपंचायती बिनविरोधच्या मार्गावर आहेत. अनेक गावांत राखीव कोट्यातील उमेदवार मिळाले नसल्याने अथवा भरलेले अर्ज अवैध ठरल्याने जागा रिक्त राहणार आहेत.

चौकट..

‘लक्ष्मीदर्शन’साठी अनेकजण व्याकूळ

अनेक गावांत हौसे-नवसे-गवसे आहेत. त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले असून, काय देता बोला... हा एकच सूर त्यांनी पॅनेल प्रमुखांकडे आळवायला सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेतले जावेत, यासाठी गावातील विविध गटांची नेतेमंडळी अशा लोकांच्या घरी जाऊन समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतात जायला वाट ठेवणार नाही, परत आमच्याशीच गाठ आहे... असा दमही भरला जात आहे. त्यातूनही अनेक उमेदवार ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याशिवाय माघार नाही, असा हट्ट धरून बसलेले आहेत.

चौकट..

अर्ज भरल्यापासून अनेकजण गायब

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि. २३ ते ३१ डिसेंबर या कालावधित उमेदवारी अर्ज भरण्यात आले. आता नेत्यांचा दबाव गृहित धरून अनेकजण गावातून निघून गेले आहेत. अनेकजण तीर्थयात्रेवर गेल्याचे समजते, तर अनेकांना पर्यटनाची संधीही मिळाली आहे. प्रवास, हॉटेलचे बुकिंग आधीच तयार होते. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक ट्रॅव्हल्स थेट तहसील कार्यालयासमोरच येऊन थांबण्याची शक्यता आहे.

Web Title: Three days of 'high voltage pressure'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.