पोवई नाक्यावर तीन दिवस चित्रीकरण!
By Admin | Published: February 19, 2015 10:05 PM2015-02-19T22:05:44+5:302015-02-19T23:46:35+5:30
प्रशासन लागले कामाला : बकालपणाला शोधणार कायमचे उत्तर
सातारा : वाहतूक कोंडीचे दुखणे सोसणारा साताऱ्यातला पोवई नाका आता मोकळा श्वास घेण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘लोकमत’ने येथील वाहतूक कोंडीवर मांडलेल्या वृत्ताची दखल घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोवई नाक्यावर उड्डाणपुलासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. पोवई नाक्यावरील वाहतुकीचे सलग तीन दिवस चित्रीकरण करून शासनाकडे सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. पोवई नाक्यावरील वाहतूक कोंडी वाढतच आहे. या ठिकाणी एकूण आठ रस्ते मिळतात. पोवई नाक्यापासून मध्यवर्ती बसस्थानक, कोरेगाव, लोणंद, कऱ्हाड, सातारा शहर, सिव्हिल हॉस्पिटल, आरटीओ आॅफिस याठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते फुटले आहेत. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने पोवई नाक्यावरील कोंडी वाढत आहे. वाहने वाढली असली तरी रस्ते तेवढेच असल्याने वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस आणखी गुंतागुंतीचा होत चालला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील मागील शनिवारी जिल्हा दौऱ्यावर असताना ‘लोकमत’ ने पोवई नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मांडला होता. याठिकाणी उड्डाणपूल तयार झाल्यास येथील वाहतुकीला शिस्त लागेल, असा युक्तिवादही या वृत्ताद्वारे मांडला होता. खासदार उदयनराजे भोसले यांनी या वृत्ताची दखल घेऊन बांधकाममंत्र्यांची विश्रामगृहावर भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पोवई नाक्यावर उड्डाणपूल होणे किती गरजेचे आहे, हे स्पष्ट केले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी रात्री पोवई नाक्यावर प्रस्तावित उड्डाणपुलाच्या जागेची पाहणी केली. तसेच त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या होत्या.दरम्यान, यानंतर बुधवारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद राजभोज, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट तसेच इतर अधिकाऱ्यांनी पोवई नाक्यावर पाहणी केली. येथील वाहतुकीबाबत कन्सल्टंट नेमून व्हिडिओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून येथील वाहतुकीचे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोवई नाक्यावरील उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी तीन पर्याय खुले आहेत. त्यामध्ये बसस्थानक ते गोडोली रस्ता, सातारा जिल्हा परिषद ते पोवई नाका, अथवा प्रशासकीय इमारत ते पोवई नाका अशा तीन रस्त्यांपैकी एका रस्त्यावर उड्डाणपूल तयार करता येईल का? याबाबत विचारविनिमय करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
असे होईल चित्रीकरण
पोवई नाक्यावर सकाळी ६ ते रात्री १२ यावेळेत व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात येईल. नाक्यावर वेगवेगळ्या अँगलमधून हे चित्रीकरण करण्यात येईल, याचा अभ्यास करून दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहे.
पोवई नाक्यावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. याठिकाणी उड्डाणपूल तयार झाल्यास निश्चितपणे वाहतूक सोयीची होईल. उड्डाणपूल बांधण्यासाठी लागणारा प्रस्ताव अद्याप तयार झालेला नाही. यासाठी कन्सल्टंट नेमून वाहतुकीचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. पोवई नाक्यावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्य कायम ठेवून या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
- शरद राजभोज, कार्यकारी अभियंता,
बांधकाम विभाग, सातारा