तीन दशकांनंतर पळशी बिनविरोध--ऐतिहासिक निर्णयाचे ग्रामस्थांमधून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:11 PM2017-10-06T23:11:17+5:302017-10-06T23:11:58+5:30
पळशी : माण तालुक्यात सर्वात मोठी, अंतिसंवेदनशील ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाºया पळशी ग्रामपंचायतीची निवडणूक तब्बल ३३ वर्षांनंतर बिनविरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
पळशी : माण तालुक्यात सर्वात मोठी, अंतिसंवेदनशील ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाºया पळशी ग्रामपंचायतीची निवडणूक तब्बल ३३ वर्षांनंतर बिनविरोध झाली. या ऐतिहासिक निर्णयाचे ग्रामस्थांनीे स्वागत केले. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शंकर गुलाब देवकुळे यांनी निवड करण्यात आली.
पळशी ग्रामपंचायत यापूर्वी १९८४ मध्ये बिनविरोध झाली होती. त्यामुळे ही निवड एक नवा पायंडा तयार करू लागली आहे. यासाठी पोलिस प्रशासनाने खरी भूूमिका पार पाडली. हा इतिहास ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून जवळपास ३३ वर्षांनी घडला. या घटनेचे साक्षीदार होताना अनेकांचा ऊरही भरून आला. बिनविरोध निवडीने अतिसंवेदनशील गाव असल्याचा कलंक पुसला गेल्याने सर्वच स्तरातून आता पळशी गावचे कौतुक होत आहे.
सरपंचपदाची निवडणूक प्रथमच थेट होत असल्याने व आरक्षण अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. सर्व पक्ष प्रमुखांनी आपापले शिलेदार रिंगणात उतरवले होते. त्यामुळे निवडणुकीला रंगत आली होती.
मात्र दहिवडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे, म्हसवडचे सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराजे देशमुख, हवालदार सुहास खाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावून गाव नेत्यांना सोबत घेऊन बैठका घेतल्या. त्यामध्ये सर्व पक्ष प्रमुखांनीही महत्त्वाची भूमिका बजावत ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले.\
सरपंच पदासाठी जितेंद्र सावंत, शंकर देवकुळे, सदाशिव सावंत यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यामधील शंकर देवकुळे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांची सरपंचपदी वर्णी लागली. तसेच सदस्य म्हणून स्वाती साबळे, कांताबाई खाडे, गोदाबाई शेळके, लता जाधव, कल्पना माळवे, योगिता देवकुळे, बबन ढोले, केशवराव वणवे, चंद्रकांत सावंत, शंकर गंबरे, सुनील खाडे, ब्रह्मदेव खाडे, मधुकर खाडे यांची निवड झाली आहे. पंंधरा पैकी एका जागेसाठी अर्ज नसल्याने ती जागा रिक्त ठेवण्यात आली आहे.यावेळी दहिवडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे, सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराजे देशमुख, सुहास खाडे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास पांढरे, महसूल कर्मचारी संतोष ढोले, डॉ. राजेंद्र खाडे, बाळासाहेब खाडे, केशवराव वणवे, अॅड. दत्तात्रय हांगे, डॉ. भास्कर खाडे, महादेव खाडे, गुलाब खाडे, लक्ष्मण माळवे, प्रा. गुलाबराव खाडे, अमित कुलकर्णी उपस्थित होते.
हम भी कुछ कम नहीं...
माण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होत होत्या; पण पळशी गाव कधीही बिनविरोध होऊच शकत नाही, अशी भविष्यवाणी करणाºयांना ग्रामपंचायतीने सुखद धक्का दिला आहे. सत्कार्यात ‘हम भी कुछ कम नही’ असेच जणू पळशीकरांनी सर्वांना सांगितले आहे.
७० वर्षांत पहिल्यांदाच पडले आरक्षण ....
पळशीत सरपंच पदासाठी जवळपास ७० वर्षांनंतर पहिल्यांदाच आरक्षण पडले होते. तर सरपंचपदाची निवडही यंदा थेट जनतेतून होणार होती. त्यामुळे सरपंच निवडीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. आरक्षणाबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडीचे शंकर देवकुळे हे पहिले मानकरी ठरले आहेत.