अपहरणाचा बनाव करणाऱ्या साताऱ्याच्या तीन मुली ताब्यात
By admin | Published: September 4, 2015 12:15 AM2015-09-04T00:15:09+5:302015-09-04T00:15:09+5:30
मुलींच्या बोलण्यात विसंगती असल्याने पोलिसांनी त्यांना खडसावल्यानंतर गोवा पाहण्यासाठी घरातून पळून आल्याची त्यांनी कबुली दिली.
मिरज : गोवा पाहण्यासाठी घरातून पळून येऊन अपहरणाचा बनाव करणाऱ्या साताऱ्यातील तीन शाळकरी मुली गुरुवारी मिरज रेल्वेस्थानकात रेल्वे पोलिसांना सापडल्या. मुलींना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सातारा येथील प्रतापसिंहनगर परिसरात राहणाऱ्या १२ व १३ वर्षे वयाच्या सातवीत शिकणाऱ्या तीन मैत्रिणी गोव्याला जाण्यासाठी कोणाला न सांगता बुधवारी रेल्वेने मिरजेला आल्या. गुरुवारी दुपारी मिरजेत हरिप्रिया एक्स्प्रेस मिरज स्थानकात प्लॅटफॉर्म एकवर आल्यानंतर तीन मुली गर्दीत थांबलेल्या पोलिसांना दिसल्या. रेल्वे पोलीस कर्मचारी बाळासाहेब पाटील व वनिता नरके यांनी पालकांशिवाय वावरत असलेल्या मुलींना हटकले. पोलिसांनी विचारणा केल्यानंतर तिघींनी अज्ञाताने साताऱ्यातील प्रातपसिंहनगर येथून मारुती व्हॅनमधून अपहरण करून सातारा रेल्वेस्थानकातून बेळगावला जाणाऱ्या रेल्वेत बसवून नेल्याचे सांगितले. बेळगाव स्थानकात गर्दी असल्याने अपहरणकर्ता तेथेच सोडून पळून गेल्याने मिरजेला परत आल्याचे त्यांनी सांगितले. मुलींच्या बोलण्यात विसंगती असल्याने पोलिसांनी त्यांना खडसावल्यानंतर गोवा पाहण्यासाठी घरातून पळून आल्याची त्यांनी कबुली दिली. तिघींपैकी एकीने घरातून तीन हजार व दुसरीने दोन हजार रुपये चोरून आणले होते. गोवा फिरण्याची तयारी करूनच या मुलींनी घरातून पलायन केल्याचे निष्पन्न झाले. सातारा पोलिसांनी मिरजेत येऊन मुलींना ताब्यात घेतले. (वार्ताहर)