हद्दपारीचा आदेश मोडून साताऱ्यात राहणाऱ्या तीन गुंडांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:50+5:302021-06-11T04:26:50+5:30
सातारा : जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही सातारा शहर परिसरात अस्तित्व लपवून राहात असलेल्या तीन गुंडांना शाहूपुरी पोलिसांनी अटक ...
सातारा : जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही सातारा शहर परिसरात अस्तित्व लपवून राहात असलेल्या तीन गुंडांना शाहूपुरी पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय रंगनाथ लोखंडे (रा. सैदापूर), विपुल तानाजी नलवडे (रा. सातारा) आणि दत्तात्रेय उत्तम घाडगे (रा. सूर्यवंशी कॉलनी, दौलतनगर, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेल्या १२ गुंडांना पोलीस अधीक्षक व उपविभागीय दंडाधिकारी यांनी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या हद्दपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवून ते हद्दीत दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील व सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना दिलेल्या होत्या. दरम्यान, लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन हद्दपार गुंड अवैधरित्या सातारा शहरात येऊन त्यांच्या घराच्या परिसरात वावरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलीस निरीक्षक संजय पंतगे यांच्याकडे आल्या. यानंतर दि. ९ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील तीन तडीपार गुंड त्यांच्या घराच्या परिसरात अस्तित्व लपवून राहत आहेत, अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने शाहूपुरी गुन्हे शाखेच्या पथकाने कंरजे, दौलतनगर व गडकर आळी परिसरात रात्री उशिरा छापे टाकून तीन हद्दपार गुंडांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात हद्दपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, मोहन पवार, पंकज मोहिते, ओंकार यादव, चालक तुषार पांढरपट्टे यांनी केली.