मेरुलिंग घाटात कार दरीत कोसळून तीन ठार: पाच जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 12:07 PM2021-04-26T12:07:41+5:302021-04-26T12:09:33+5:30
Accident Satara : जावली तालुक्यातील मेरुलिंगच्या घाटात रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास इर्टीगा कार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.तर पाच जण जखमी झाले आहेत.
कुडाळ : जावली तालुक्यातील मेरुलिंगच्या घाटात रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास इर्टीगा कार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.तर पाच जण जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रेशनिंग आणण्यासाठी इर्टीगा कारमधून जात असताना मेरुलिंग घाटात एका अवघड वळणावर कार थेट पाचशे फूट खोल दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना बाहेर काढले.
या अपघातात कारमधील कारचालक शिवाजी जगन्नाथ साबळे (वय ४०), लिलाबाई गणपत साबळे (५५), आणि सागर सर्जेराव साबळे (३२, सर्व रा. मेरुलिंग, ता जावळी, जिल्हा सातारा) या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर मेढा पोलिसांनी मेरुलिंग घाटामध्ये धाव घेऊन जेसीबीच्या साह्याने कार दरीतून वर काढली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. हा अपघात पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अत्यंत अवघड वळणावर हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.