कारची काच फोडून साडे तीन लाखांची रोकड लंपास, साताऱ्यात भरदिवसा घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 01:51 PM2022-03-24T13:51:54+5:302022-03-24T13:52:18+5:30
अशा घटनामुळे चोरट्यांनी पोलिसांसमोर एक आव्हानच उभे केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
सातारा : शहरात चोरींच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल, बुधवारी सायंकाळी रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या डॉक्टरांच्या कारची काच फोडून ३.५० लाखांची रोकड लंपास करण्यात आली. अशा घटनामुळे चोरट्यांनी पोलिसांसमोर एक आव्हानच उभे केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा शहरातील विसावा नाक्यावर एक हॉटेल आहे. काल बुधवारी सायंकाळच्या सुमारास हॉटेलसमोर रस्त्यावर कार (एमएच, ११. सीजी, २४००) उभी केली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने पार्क केलेल्या कारचा पाठीमागील बाजूची काच फोडून कारमधून ३ लाख ५९ हजार २०० रुपये रोख आणि गाडीची तसेच रुग्णालयाची कागदपत्रे लंपास केली.
कारची काच फोडून चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर संतोष श्रीरंग यादव (रा. शाहूनगर, गोडोली, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी हवालदार एस. के. पोळ हे तपास करीत आहेत.
दरम्यान, सातारा शहर व परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच मंगळवारी सकाळीही दोन महिलांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले होते. त्यामुळे चोरट्याने पोलिसांसमोर एकप्रकारे आव्हानच उभे ठाकले आहे. पोलिसांकडून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात याव्यात, अशा अपेक्षा सातारकर नागरिकांतून व्यक्त होत आहेत.