कऱ्हाडजवळच्या गावात घुसले चक्क तीन बिबटे; विजयनगरमध्ये धावाधाव
By संजय पाटील | Published: October 2, 2023 10:24 PM2023-10-02T22:24:01+5:302023-10-02T22:24:27+5:30
ग्रामस्थांची पाचावर धारण; वन विभागाकडून बिबट्यांची शोधमोहीम
संजय पाटील, कराड : कऱ्हाड शहराचे उपनगर असलेल्या विजयनगर गावामध्ये एकाचवेळी तीन बिबटे घुसल्याने गावात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गावातील विद्यालयाजवळ हे तीन बिबटे दिसले. त्यानंतर ते गावात घुसल्यामुळे धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळतच वन विभागाचे पथक गावात दाखल झाले असून बिबट्यांचा शोध घेतला जात आहे.
कऱ्हाड-पाटण मार्गावर कऱ्हाडपासून चार किलोमीटर अंतरावर विजयनगर हे गाव आहे. या गावातील प्रेमलाकाकी चव्हाण विद्यालयाच्या परिसरात सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही युवक थांबले होते. विद्यालयाचे कर्मचारी संतोष माने हेही त्याठिकाणी होते. त्यावेळी युवकांपासून केवळ पाच ते सहा फूट अंतरावरून तीन बिबटे एकापाठोपाठ गेल्याचे युवकांना दिसले. बिबट्यांना पाहताच युवकांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबटे गावातील महाकाली दूध संघाच्या परिसराकडे गेले. त्यानंतर युवकांनी याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यामुळे संपूर्ण गाव त्याठिकाणी जमा झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथकही तातडीने गावात दाखल झाले आहे. गावासह परिसरात संबंधित बिबट्यांचा वनविभागाकडून रात्री उशिरापर्यंत शोध घेतला जात होता.
दरम्यान, कऱ्हाडजवळ रविवारी रात्रीच कोयना वसाहत येथे एका बिबट्याने मानवीवस्तीत घुसून हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी रात्री विजयनगर येथे तीन बिबट्यांनी थेट गावातच प्रवेश केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात तीन बिबटे दाखल झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण गाव दहशतीखाली आले आहे. वन विभागाचे कर्मचारी बिबट्यांच्या शोधार्थ परिसर पिंजून काढत आहेत. रात्री उशिरापर्यंत ही शोध मोहीम सुरूच होती.