साताऱ्याजवळ अपघातात एकाच कुटुंबातील जयसिंगपूरचे तिघे ठार
By दत्ता यादव | Published: August 26, 2023 11:22 AM2023-08-26T11:22:16+5:302023-08-26T11:22:33+5:30
तवेरा गाडीचा टायर फुटला; नवी मुंबईहून गावी जाताना अपघात
दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या तवेरा गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच घरातील तीन जण ठार झाले. हा अपघात शनिवारी सकाळी सात वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ झाला.
निखिल श्रीकांत सवाखंडे (वय 30),प्रियांका निखिल सवाखंडे (32),शशिकांत यदुनाथ सव्वाखंडे (63, सर्व रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) अशी अपघातात ठार झालेल्या एकाच कुटुंबातील लोकांची नावे आहेत. इतर जखमींवर जिल्हा शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण नवी मुंबई येथून जयसिंगपूरकडे तवेरा गाडीतून निघाले होते.
साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात असणाऱ्या कणसे हुंडाई शोरूमजवळ अचानक तवेरा गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे समोर असलेल्या बोलेरो पिकअप टेम्पोला तवेराची पाठीमागून जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, या गाडीत प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. आणि इतर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये तवेरा गाडीचा चक्काचूर झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून अपघातग्रस्त गाड्या हटवण्यात आल्या आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची अद्याप नोंद झाली नाही.