भुईज येथील खून प्रकरणात आणखी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:35 AM2021-01-17T04:35:05+5:302021-01-17T04:35:05+5:30

सातारा : दहा दिवसांपूर्वी आसले (ता. वाई) येथील हॉटेल व्यावसायिक ओंकार चव्हाण (वय ३०) याचा खुनानंतर मृतदेह जाळला होता. ...

Three more arrested in Bhuiyan murder case | भुईज येथील खून प्रकरणात आणखी तिघांना अटक

भुईज येथील खून प्रकरणात आणखी तिघांना अटक

googlenewsNext

सातारा : दहा दिवसांपूर्वी आसले (ता. वाई) येथील हॉटेल व्यावसायिक ओंकार चव्हाण (वय ३०) याचा खुनानंतर मृतदेह जाळला होता. यापूर्वी तिघांना अटक झाली होती. आता आणखी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. यातील एक संशयित रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.

जयेश ऊर्फ बंटी शामराव मोरे (३२), अक्षय संजीव जाधव (२१), वरुण समरसिंग जाधव (२३, सर्व रा. भुईंज, ता. वाई) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, ओंमकार चव्हाण हा हॉटेल व्यावसायिक होता. तो अचानक बेपत्ता झाल्यानंतर भुईंज पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली. एलसीबीची टीम या घटनेचा तपास करीत असताना त्यांना ओंमकार याचा घातपात झाल्याची माहिती मिळाली. त्यासंबंधी अधिक तपासाला सुरुवात करून सुरुवातीला काही संशयितांना अटक केली. त्या संशयितांनी ओंमकारचा खून केल्याची कबुली दिली. खून केल्यानंतर मृतदेहाबाबत पोलिसांनी माहिती विचारल्यानंतर त्यांनी हादरवून सोडणारी माहिती दिली.

संशयित टोळक्याने ओंमकारचे अपहरण केल्यानंतर नदीकाठी नेऊन तेथे खून केला. या प्रकरणाची वाच्यता कुठेही होऊ नये यासाठी मृतदेह स्मशानभूमीत जाळला. त्यानंतर संशयितांनी मृताच्या अस्थी नदीत टाकल्याची कबुली दिली. या टोळीमध्ये कोणाचा समावेेश होता व कोणी सल्ला दिला, यासंबंधीची माहिती संशयितांनी पोलिसांना दिली. संशयितांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीसही थबकले. तोपर्यंत इतर संशयित आरोपी घटनेनंतर पसार झाले.

गेले दहा दिवस पोलीस संशयितांच्या मागावर होते. दि. १६ जानेवारीला यातील तीन संशयित आरोपी साळमूख चौक, वेळापूर, जि. सोलापूर येथे असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना अटक केली. यावेळी संशयितांकडून पोलिसांनी एक कारदेखील जप्त केली. संशयितांकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच यातील एकजण रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस हवालदार संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, अमित सपकाळ, गणेश कापरे, रोजहत निकम, सचिन ससाणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: Three more arrested in Bhuiyan murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.