एसटी झाडावर धडकून तीन प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:56 PM2019-10-12T13:56:31+5:302019-10-12T13:57:58+5:30
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव एसटी रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडावर धडकली. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाई : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव एसटी रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडावर धडकली. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राहुल मोहन शिंदे (वय २३, रा. बावननाका, वाई), सुलोचना राजाराम गायकवाड (वय ५०, रा. गोगलवाडी महाबळेश्वर), ज्योती सुनिल सुसगोहेरे (वय ३८, रा. पुणे स्टेशन) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, खंडाळा आगाराची बस (क्र.एमएच १४ बीटी ३३६२) महाबळेश्वरहून पाच वाजता पुण्याला निघाली होती.
वाई-सूरूर रस्त्यावर शाहाबाग फाटा येथे साडेसहाच्या सुमारास बस आली असता ओव्हरटेक करताना समोरच्या गाडीला वाचविताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याशेजारील झाडावर जोरदार धडकली. यामध्ये वरील तीन प्रवासी जखमी झाले.
या अपघाता एसटीच्या पुढील बाजूचा अक्षरश: चक्काचूर झाला. जखमींना वाई येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.