तीन गावांमध्ये ‘माणूस’ वाचला!
By admin | Published: October 14, 2015 11:06 PM2015-10-14T23:06:03+5:302015-10-15T00:31:59+5:30
सह्याद्री व्याघ्रप्रकल्प : ‘लोकमत’च्या मालिकेनंतर बाधित जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटली; पुनर्वसनाची घोषणा--...पण अगोदर \ माणूसही वाचवा!
पाटण : ‘सेव्ह द टायगर; पण अगोदर माणूस वाचवा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने सलग सात दिवस पाटण तालुक्यातील गावांची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमुळे कशी ससेहोलपट सुरू आहे. तसेच जनतेच्या प्रश्नाचे व जाचक अटींचे वास्तववादी लिखाण केले होते. त्यामुळेच मळे, कोळणे आणि पाथरपूंज या कोअर (गाभा) क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन केल्याची घोषणा वन्यजीव विभागाने नुकतीच केली.‘लोकमत’मधून वृत्तमालिका सुरू असतानाच पुणे विभागीय आयुक्तांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण, जावळी, कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची बैठक बोलावून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प समन्वय समितीचा बैठक आढावा घेतला.त्यानंतर लगेच ढेबेवाडी विभागात वन्यजीव विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले. त्याद्वारे आता निवी, कसणी, पळशी, मासोली अशा गावांमध्ये शामप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत विकासकामे सुरू केली आहेत.
आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना विभागात जाऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पबाधित लोकांचे प्रश्न वन्यजीव अधिकाऱ्यांपुढे मांडण्यासाठी बैठक घेतली. या सर्व घटना ‘लोकमत’च्या मालिकेमुळेच घडून आल्या असून, तालुक्यातील व्याघ्रबाधित जनतेला न्याय मिळण्याची प्रक्रिया आता सुरू झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
राजाभाऊ शेलार यांचा जलसमर्पणाचा इशारा
घाटमाथा ते नवजा आणि कोयना जलाशयाच्या काठावरील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कोअर झोनमध्ये येणारी १४ गावे वगळावीत तसेच बफर झोन रद्द करावा, खासगी लाँचना परवानगी द्यावी, आदी मागण्या जर २ नोव्हेंबरपर्यंत मान्य झाल्या नाही, तर ५ नोव्हेंबर रोजी कोयना धरणात जलसमर्पण करण्याचा इशारा दिला आहे. मानवी हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन दिले.
पांढरेपाणी गावचे पुनर्वसन करणार : शंभूराज देसाई
पांढरेपाणी ग्रामस्थांनी पुनर्वसनाची मागणी करून तसा प्रस्ताव दिला तर त्या गावचे पुनर्वसन करण्यासंदर्भात नक्कीच कार्यवाही करू, अशी ग्वाही आमदार शंभूराज देसई यांनी ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेत दिली. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस उपस्थित होते.