कोरेगावात तिघेजण लाच घेताना जाळ्यात
By admin | Published: September 19, 2015 11:47 PM2015-09-19T23:47:50+5:302015-09-19T23:52:03+5:30
१५ हजारांची लाच स्वीकारली : वाळूची वाहने न अडविण्यासाठी पैसे मागितले
सातारा : वाळूची वाहने अडवू नयेत, यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोरेगाव तहसील कार्यालयात शनिवारी रात्री ताब्यात घेतले. यामध्ये दोन लिपिक आणि एका तलाठ्याचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत तिघांकडे चौकशी करण्याचे काम सुरू होते.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, कोरेगाव तालुका हद्दीतील वाळू नेताना वाहने अडवू नयेत, यासाठी ही लाच स्वीकारण्यात आली होती.
संबंधित तक्रारदार हे गोपूज, ता. खटाव येथील आहेत. त्यांच्या तक्रारीनंतर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोरेगाव तहसील कार्यालयात सापळा रचला. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना संबंधितांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये दोन लिपिक असून एक तलाठी आहे. यापूर्वीही तक्रारदाराकडून ४० हजार रुपये घेण्यात आले होते.
ताब्यात घेतलेल्या तिघांकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यामुळे या ‘लाच’ प्रकरणात किती जणांचा समावेश आहे ते रविवारी सकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे, अशी माहितीही ‘लाचलुचपत’कडून देण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)