महिलांना देहविक्रीस भाग पाडणाºया तीन रिक्षाचालकांना अटक--सातारा क्राईम न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 09:45 AM2019-04-08T09:45:45+5:302019-04-08T09:56:25+5:30

महिलांना देहविक्रय करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून तीन रिक्षाचालकांसह एका महिलेवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघारिक्षाचालकांना अटक केली आहे

Three rickshaw pullers arrested for sexually assaulting women | महिलांना देहविक्रीस भाग पाडणाºया तीन रिक्षाचालकांना अटक--सातारा क्राईम न्यूज

महिलांना देहविक्रीस भाग पाडणाºया तीन रिक्षाचालकांना अटक--सातारा क्राईम न्यूज

Next
ठळक मुद्देरिक्षाचालकांशी ओळख करून महिलांची ने आण करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा ठपका एका महिलेवर ठेवण्यात आला

सातारा : महिलांना देहविक्रय करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून तीन रिक्षाचालकांसह एका महिलेवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघारिक्षाचालकांना अटक केली आहे.

प्रकाश गोकुळदास शिंदे (वय ४०, रा. मल्हार पेठ, सातारा), उत्कर्ष शंकर दिवाण (वय ४१, रा. सदर बझार सातारा), संभाजी संपत चव्हाण (वय ४७,रा. शाहूपुरी, गुरूप्रसाद कॉलनी अंबेदरे रोड सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, बसस्थानकासमोरील एका हॉटेलवर शहर पोलिसांनी दि. ५ रोजी रात्री नऊ वाजता छापा टाकला. यावेळी देहविक्रय करताना चार महिला आढळून आल्या. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संबंधित तीन रिक्षाचालक स्वत:च्या उपजिवीकेसाठी रिक्षातून विविध लॉजवर महिलांना पाठवत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिघा रिक्षाचालकांना अटक केली. दरम्यान रिक्षाचालकांशी ओळख करून महिलांची ने आण करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा ठपका एका महिलेवर ठेवण्यात आला असून, संबंधित महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा : चौघे ताब्यात

 

सातारा : शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिसांनी तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकीसह सुमारे १८ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
अमोल आनंद वासुदेव (वय ३४), अमीत विष्णू नलवडे (रा. मंगळवार पेठ, सातारा), माधव अनंत खामकर (वय ३५, रा. वेचले, ता. सातारा), महादेव मडिवळ नाटेकर (वय ३२, रा. नागेवाडी, ता. सातारा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
शाहूपुरी पोलिसांनी समर्थ मंदिर चौकामध्ये सुरू असणाºया जुगार अड्ड्यावर छापा टाकून वासुदेव आणि नलवडे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकीसह ३६ हजार १९५ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. तसेच सातारा तालुका पोलिसांनी शेंद्रे येथे छापा टाकून माधव खामकरला ताब्यात घेतले. तर नागेवाडी येथे छापा टाकून पोलिसांनी महादेव नाटेकर याला ताब्यात घेतले. दोघांकडून सुमारे दीड हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी जुगार अड्ड्यावर सातत्याने कारवाई सुरू केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 

भर दुपारी वृद्धेच्या गळ्यातील मोहनमाळ हिसकावली

सातारा : येथील जुना मोटार स्टॅन्डजवळून चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्याला हिसका मारून दीड तोळ्याची मोहनमाळ चोरून नेली. ही घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारा घडली.
गंगुबाई बळीराम नावडकर (वय ८०, रा. सोनगाव, ता. सातारा) या शुक्रवारी दुपारी कामानिमित्त साताºयात आल्या होत्या. जुना मोटार स्टॅन्ड येथून चालत जात असताना पाठीमागून दोन युवक दुचाकीवरून आले. ‘आजी रस्त्यातून काय चालताय बाजूला व्हा,’ असं म्हणून दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाने त्यांच्या गळ्यातील मोहनमाळ हिसकावली. त्यामुळे तोल गेल्याने गंगुबाई नावडकर या खाली पडल्या. काही वेळातच दुचाकीवरून आलेले चोरटे तेथून पसार झाले. दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने जुना मोटार स्टॅन्ड परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम शाहूपुरी पोलिसांनी सुरू केले आहे.

 

टँकरच्या धडकेत माथाडी कामगार ठार

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लिंब (ता. सातारा) गावच्या हद्दीत गौरीशंकर कॉलेजजवळ टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील राजेंद्र बाबा रोकडे (वय ४५, रा. एकंबे, ता.कोरेगांव) या माथाडी कामगाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला.
राजेंद्र रोकडे हे पत्नीसोबत दुचाकीवरून एकंबेकडे निघाले होते. यावेळी कोल्हापूरकडे निघालेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत रोकडे हे रस्त्यावर फेकले गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला व छातीला जोरदार मार लागल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी शितल रोकडे या सुद्धा जखमी झाल्या आहेत.  जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजेंद्र रोकडे हे मुंबई येथे माथाडी कामगार म्हणून काम करत होते, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Three rickshaw pullers arrested for sexually assaulting women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.