टेम्पो चालकाला लुटणाऱ्या तिघांना अटक : चोरीचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 09:04 PM2020-01-08T21:04:14+5:302020-01-08T21:06:36+5:30
सहकाऱ्यांची नावे समजल्यानंतर रोहित आणि अन्य एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी साता-यातील विविध ठिकाणाहून अटक केली. अद्याप या तिघांचा अन्य एक सहकारी फरार आहे. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, आणखी कुठे लुटीचा प्रकार केला आहे का, याबाबातही पोलीस तिघांकडे कसून चौकशी करत आहेत.
सातारा : लघुशंकेसाठी महामार्गालगत थांबलेल्या पिअकप टेम्पो चालकाचा मोबाईल आणि रोकड चोरून नेणाºया तिघांना शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. पोलिसांनी संबंधितांकडून ८ हजार ८०० रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त केला आहे.
सुरज राजू माने (वय २१), रोहित संजय देवकुळे (वय १९, रा. लक्ष्मीटेकडी, सदर बझार सातारा) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा अटक झालेल्यामध्ये समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नीलेश धर्मा काकडे (वय २९, रा. होळमुक्त, ता. बारामती. जि. पुणे) हा दि. २६ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता पिकअप टेम्पो घेऊन क-हाडकडे निघाला होता. यावेळी खेड फाट्यावर काकडे हा लघुशंकेसाठी थांबला होता. त्यावेळी चौघेजण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने तंबाखू खाण्यास मागून फोन करण्याच्या बहाण्याने त्यांना मोबाइल मागितला. त्यावेळी काकडे याने टेम्पोच्या डॅशबोर्डवर मोबाइल व पाकिट ठेवले. वरील संशयितांनी हातचलाखी करून मोबाइल आणि पाकिट घेऊन पलायन केले होते.
सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. दरम्यान, सदर बझारमधील पिण्याच्या टीकीजवळ बुधवारी संशयित एकजण आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ तेथे जाऊन सुरज माने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अन्य सहकाऱ्यांची नावे समजल्यानंतर रोहित आणि अन्य एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी साता-यातील विविध ठिकाणाहून अटक केली. अद्याप या तिघांचा अन्य एक सहकारी फरार आहे. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, आणखी कुठे लुटीचा प्रकार केला आहे का, याबाबातही पोलीस तिघांकडे कसून चौकशी करत आहेत.
पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, सहायक पोलीस उपनिरीक्षक डी. वाय. कदम, पोलीस नाईक शिवाजी भिसे, धीरज कुंभार, किशोर तारळकर, अभय साबळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला.