सातारा जिल्ह्यातील तीन शाळांचा राज्यस्तरीय गौरव, स्वच्छ विद्यालयासाठी राष्ट्रीय नामांकन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 01:48 PM2022-08-17T13:48:13+5:302022-08-17T13:48:41+5:30
माध्यमिक विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा प्रथम, तर प्राथमिक विभाग शहरीतून कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा प्रथम
सातारा : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी प्रत्येक जिल्ह्यातून १४ शाळांचे नामांकन करण्यात आले होते. यामध्ये जावळी तालुक्यातील ओझरे जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विभागात पाटण तालुक्यातील तळमावले येथील एस वाल्मिकी विद्यामंदिर व शहरी विभागात पाटण व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या तिन्ही शाळांचे राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे जिल्ह्यातील शाळांना राज्य पातळीवर गौरवण्यात आल्याने शिक्षण विभागाचा नावलौकिक वाढला आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यातील ९३.९८% शाळांनी सहभाग घेतला होता. या शाळांचे मूल्यमापन करून जिल्हास्तरावरून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रत्येक जिल्ह्यातील चौदा शाळांचे नामांकन पाठविण्यात आले होते. या शाळांची राज्यस्तरीय मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होऊन प्राथमिक विभागातून ग्रामीण भागातील सहा शाळांची निवड करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील शाळा पहिली आली असून सहाव्या क्रमांकावर ओझरे तालुका जावळी शाळेची निवड झाली आहे. ९३.८% गुण या शाळेस मिळाले आहेत.
माध्यमिक विभागातून राज्यातील सहा शाळांची निवड करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा प्रथम आली आहे. यात एस वाल्मिकी विद्यामंदिर तृतीय क्रमांकावर असून शाळेला ९६.०४ टक्के गुण मिळाले आहेत. प्राथमिक विभाग शहरीतून चार शाळांची निवड करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा प्रथम आली आहे. पाटण व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल दुसऱ्या क्रमांकावर असून शाळेत ९६.०७ टक्के गुण मिळाले आहेत. जिल्ह्यातील तीन शाळांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी समाधान व्यक्त करून शिक्षक संस्थाचालक यांच्यासह विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
केंद्रस्तरावर जिल्ह्यातील तीन शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळाला असून हे विद्यार्थी व शिक्षकांचे यश आहे. या तिन्ही शाळांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळणं ही जिल्ह्यासाठी कौतुकास्पद बाब आहे. पुढील वर्षी जिल्ह्यातील आणखी शाळांचा समावेश होण्यासाठी प्रयत्नशील राहू. - प्रभावती कोळेकर, शिक्षण अधिकारी माध्यमिक सातारा