जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशभंगप्रकरणी तीन दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:40 AM2021-05-12T04:40:42+5:302021-05-12T04:40:42+5:30
महाबळेश्वर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शहरात कारवाई केली. यामध्ये मंगळवारी तीन दुकाने सील केली ...
महाबळेश्वर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शहरात कारवाई केली. यामध्ये मंगळवारी तीन दुकाने सील केली आहेत. दरम्यान आजअखेर दंडात्मक कारवाई करून पालिकेने दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम वसूल केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या लाॅकडाऊनमध्ये दुकाने सुरू ठेवण्यास मनाई केली असताना बाजारपेठेतील काही दुकाने व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. या तक्रारींची मुख्याधिकारी यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी विशेष पथकासह महाबळेश्वर बाजारपेठेची पाहणी केली असता मंगळवारी सुभाष चैकातील ऑर्चिड माॅलमधील काही दुकाने अर्धवट उघडी होती. तर एका दुकानात ग्राहक आढळून आले. या माॅलमधील मोबाइल विक्री व दुरुस्ती, एक भांड्याचे व एक कपड्याचे दुकान अर्धवट स्थितीत आढळून आले. ज्या दुकानात ग्राहक आढळून आले. त्या दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली व माॅलमधील ती तीनही दुकाने सील करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशापर्यंत ही दुकाने बंद राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. शहरातील दुकानदारांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहाकार्य करावे व कोरोना विरोधातील लढाईस हातभार लावावा, असे आवाहन मुख्याधिकारी पाटील यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून शहरात पालिकेने विशेष पथकाची नेमणूक केली आहे.
या पथकाने वेगवेगळ्या घटनांत आतापर्यंत १० लाख १३ हजार १६० रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.