सहा ग्रामपंचायतींपैकी तीन बिनविरोध..
By admin | Published: December 9, 2015 01:06 AM2015-12-09T01:06:26+5:302015-12-09T01:06:26+5:30
कऱ्हाड तालुका : अर्जांची छाननी; ५२ उमेदवरांची निवडणूक रिंगणातून दोघांची माघार
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर मंगळवारी ५२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ६५ अर्ज शिल्लक राहिले. तर आदर्शनगर, हरपळवाडी आणि गोंडवाडी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्शनगर ग्रामपंचायत, उत्तर कोपर्डे ग्रामपंचायत, उत्तर तांबवे ग्रामपंचायत, कोयना वसाहत ग्रामपंचायत, गोडवाडी ग्रामपंचायतीसाठी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील कोयनावसाहत ग्रामपंचायतीमधील ४४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर १० जागांसाठी २३ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. उत्तर तांबवे ग्रामपंचातीसाठी १३ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ५ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. या ग्रामपंचायतीच्या ४ जागा बिनविरोध झाल्या. मांगवाडी ग्रामपंचायतीसाठी २१ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या ठिकाणी १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उत्तर कोपर्डेसाठी २१ उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यातील ९ जणांनी माघार घेतल्याने १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दोन जागा बिनविरोध झाल्या. तर हरपळवाडी, गोंडवाडी, आदर्शनगर ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. निवडणुकीतील उमेदवारांना आजच चिन्हांचे वाटप करण्यात
आले. (प्रतिनिधी)