नागठाणे भागासाठी तीन एसटी गाड्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:39 AM2021-07-31T04:39:01+5:302021-07-31T04:39:01+5:30
नागठाणे : नागठाणे भागातील काही गावांसाठी एसटी सुरू झाल्यामुळे भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून ...
नागठाणे : नागठाणे भागातील काही गावांसाठी एसटी सुरू झाल्यामुळे भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून सातारा ते नागठाणे भागाकडे येणाऱ्या सर्व गाड्या बंद होत्या. त्यामुळे नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय, जिल्हा सैनिक कार्यालय, जिल्हा सरकारी रुग्णालयात जाताना गैरसोय होत होती.
सध्याचे दिवसात कोरोनाच्या संदर्भातील रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम शिथिल केल्यामुळे राज्य परिवहन मंडळाकडून सातारा बसस्थानकातून नागठाणे भागात सातारा-मांडवे, सातारा-दुसाळे, सातारा-तारळे गाडी सुरू केली. यामुळे नागठाणे भागातील सामान्य नागरिकांना थोड्या फार प्रमाणात दिलासा मिळाला असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा बसस्थानकातून नागठाणे भागात नेहमीप्रमाणे मांडवे, तुकाईवाडी, दुर्गळवाडी, पाडळी, दुसाळे, मुरुड, तारळे, अंगापूर, कामेरी यातील काही गाड्या बोरगाव मार्गे तर काही नागठाणे मार्गे येत असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या तसेच जिल्हाधिकारी यांचे संचारबंदी, जमावबंदी आदेशामुळे वर्षभर त्या बंद होत्या.
त्यामुळे नागरिकांना स्वखर्चाने चारचाकी किंवा दुचाकी गाडी घेऊन साताऱ्याला जावे लागत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठी आर्थिक अडचण निर्माण होताना दिसत होती. परंतु सध्याचे दिवसात जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या काही प्रमाणात कमी होताना दिसत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम शिथिल केले. त्यामुळे सातारा बसस्थानकातून या गाड्या सुरू केल्या.
चौकट
सातारा बसस्थानकातून नागठाणे भागात येणाऱ्या मांडवे, दुसाळे, तारळे या तीन एसटी बस सुरू केल्या असून या तिन्ही गाड्यांना वेळेचे बंधन घालण्यात आले आहे.