मसूरमध्ये तीन एटीएम चोरट्यांनी रात्रीत फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:51 PM2018-10-03T23:51:47+5:302018-10-03T23:51:52+5:30
मसूर : येथील मुख्य चौकातील तीन एटीएम चोरट्यांनी मंगळवारी रात्री फोडली. त्यातील दोन मशीनमधून सुमारे एक लाखाची रोकड लंपास करण्यात आली आहे. तर तिसऱ्या मशीनबाबत बँकेकडून खातरजमा झाली नसल्याने किती रक्कम चोरीला गेली, हे स्पष्ट झाले नव्हते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मसूरमध्ये वेगवेगळ्या बँकांची एकूण चार एटीएम सेंटर आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र बँक, आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक आणि कºहाड अर्बन बँक या बँकांच्या एटीएमचा समावेश आहे. अर्बन बँकेच्या शाखेजवळच त्यांचे एटीएम सेंटर आहे. याठिकाणी नेहमी पहारा देण्यासाठी एक सुरक्षारक्षक असतो. तर इतर दोन बँकांची एटीएम त्या-त्या बँकेच्या शाखेपासून काही अंतरावर आहेत.
मसूर-उंब्रज रस्त्यावर युवराज पाटील चौकानजीक महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. तर याच रस्त्यावर स्टँड चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. कºहाड-मसूर रस्त्यावर अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. मंगळवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तिन्ही ठिकाणची एटीएम फोडली. प्रत्येक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरेही चोरट्यांनी फोडले आहेत. एटीएम मशीनमध्ये कोणत्या तरी लोखंडी वस्तूने प्रहार करून मशीन फोडण्यात आलेली आहेत. परंतु चोरट्यांना मशीनमधील सर्व रक्कम काढता आली नाही.
मंगळवारी रात्री मसूरमध्ये जोरदार पाऊस होता. त्यामुळे सगळीकडे सामसूम होते. उंब्रज-मसूर आणि कºहाड-मसूर रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ चालू असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी या चोरी झाल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयडीबीआय बँकेच्या एटीएमजवळ लोकवस्ती आहे. परंतु याठिकाणी कोणताही आवाज न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चोरट्यांनी प्रत्येक एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आहेत आणि मशीनचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी प्रत्येक ठिकाणी भेट देऊन कर्मचाºयांना तपासकामी सूचना दिल्या. पोलिसांनी याठिकाणी घटनेचा तपास लावण्यासाठी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. पावसामुळे चिखल झाल्याने श्वानपथकाला माग काढता आला नाही तर ठसे तज्ज्ञांना काही ठिकाणी ठसे मिळून आले आहेत.
चोरट्यांना मिळाली आयती संधी
मसूर पोलीस दूरक्षेत्रातील एक कर्मचारी नेहमी रात्रपाळीसाठी चौकात असतो. परंतु मंगळवारी रात्री रात्रपाळीसाठी कोणताही कर्मचारी चौकात उपस्थित नसल्याची चर्चा ग्रामस्थांमधून सुरू होती. ज्या ठिकाणी रात्रपाळीसाठी कर्मचारी रात्रगस्त घालत असतात, त्या ठिकाणाहून आयडीबीआय बँकेचे एटीएम सेंटर व अॅक्सिस बँकेचे एटीएम सेंटर दिसतात. मात्र, पोलीस कर्मचारीच उपस्थित नसल्याने चोरट्यांना आयतीच संधी मिळाली, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.