राज्यातून तीन हजार वकीलपत्रे

By admin | Published: September 27, 2015 12:42 AM2015-09-27T00:42:23+5:302015-09-27T00:45:30+5:30

सांगली आघाडीवर : तीनशे प्रतिकात्मक वकीलपत्रे न्यायालयात सादर

Three thousand solicitors from the state | राज्यातून तीन हजार वकीलपत्रे

राज्यातून तीन हजार वकीलपत्रे

Next

सांगली : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पानसरे कुटुंब व शासन यांच्यावतीने वकीलपत्र घेण्यासाठी राज्यातील सुमारे तीन हजार वकील पुढे आले आहेत. त्यांनी वकीलपत्र घेतल्याची कागदपत्रे सह्या करून कोल्हापुरातील वकील संघटनेकडे सादर केली आहेत. वकीलपत्र घेण्यासाठी सांगलीतून सुरुवात झाली होती.
शुक्रवारी शंभरजणांनी वकीलपत्र घेतले आहे. यात शनिवारी वाढ झाली. तब्बल पाचशे वकिलांनी याप्रकरणी सहभाग नोंदविला. एवढ्या मोठ्या प्रमाणात वकीलपत्र न्यायालयात सादर करणे शक्य नसल्याने प्रतिकात्मक वकीलपत्र कोल्हापुरातील न्यायालयात सादर केले आहे.
पानसरे हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवून घेण्यासाठी गेल्या आठवड्यात न्यायालयात उभे केले होते. त्यावेळी सनातन संस्थेने गायकवाडच्या बाजूने ३१ वकिलांची फौज उभी केली होती. ‘सनातन’ला आव्हान देण्यासाठी सांगलीतील अ‍ॅड. के. डी. शिंदे, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, अ‍ॅड. अमित शिंदे यांनी पुढाकार घेतला. पानसरे कुटुंब व शासनातर्फे बाजू मांडण्यासाठी त्यांनी वकिलांची फौज उभी करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात त्यांनी शुक्रवारी केली होती. पहिल्या दिवशी सांगलीतून शंभर वकील पुढे आले होते. शनिवारी यात वाढ झाली. तब्बल चारशे वकिलांनी अ‍ॅड. अमित शिंदे यांच्याशी संपर्क साधून आम्ही पानसरे यांचे वकीलपत्र घेत असल्याचे सांगून कागदपत्रे सह्या करून दिली. सांगलीतून तब्बल पाचशे वकिलांची वकीलपत्रे आली आहेत. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, यवतमाळ, अकोलासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून तीन हजार वकील पुढे आले आहेत. या सर्वांनी वकीलपत्र घेतले असल्याची कागदपत्रे सह्या करून कोल्हापुरातील वकील संघटनेला सादर केली आहेत.
एवढी सगळी वकीलपत्रे न्यायालयात सादर करणे शक्य नाही. त्यामुळे केवळ तीनशे प्रतिकात्मक वकीलपत्रे न्यायालयात सादर केली. यामध्ये सांगलीतील दीडशे व कोल्हापुरात दीडशे वकीलपत्रांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
वकीलपत्र घेण्याच्या मोहिमेला राज्यातून वकिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दीड-दोनशे वकिलांनी वकीलपत्र घेतले आहे. अजूनही अनेक वकील संपर्क साधत आहेत. न्यायप्रकियेत पानसरे कुटुंबास सर्वतोपरी मदत केली जाईल.
- अ‍ॅड. अमित शिंदे, सांगली.
 

Web Title: Three thousand solicitors from the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.