खड्ड्यात गाडी आदळून १२ वाहनांचे टायर फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 10:38 AM2019-09-09T10:38:31+5:302019-09-09T10:42:22+5:30
वाढे फाटा येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वाहने आदळून दहा ते बारा गाड्यांचे टायर फुटल्याची घटना रात्री घडली. यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
सातारा : वाढे फाटा येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वाहने आदळून दहा ते बारा गाड्यांचे टायर फुटल्याची घटना रात्री घडली. यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
वाढे फाट्यावरील पुलावरून जड वाहतुकीला बंदी असताना दोन दिवसांपूर्वी मालवाहतूक करणारा ट्रक पुलावर अडकला होता. त्यामुळे पूर्वी खड्डे पडले होते. त्यामध्ये आणखी पुलावर मोठ्या खड्ड्यांची भर पडली.
या खड्ड्यांमुळे चारचाकी वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडले. खड्ड्यामध्ये टोकदार सळ्या असल्यामुळे टायर फुटले असावेत, असे वाहन चालकांचे म्हणणे होते. दहा ते बारा कारचे टायर फुटल्यामुळे सर्व कार पुलावरच उभ्या होेत्या. त्यामुळे काही वेळ वाहतुकीचा प्रश्नही बिकट झाला होता.
काही वाहन चालक पर्यायी स्टेपनी बदलून पुढे निघून गेले. परंतु रात्री पंक्चर काढण्याचे दुकान बंद असल्याने सकाळपर्यंत बऱ्याचजणांना ताटकळत उभे राहावे लागले. इतर वाहन चालकांना हा अनुभव येऊ नये म्हणून पुलावरील खड्डे तातडीने मुजवावेत, अशी मागणी वाहनधारक तसेच वाढे ग्रामस्थांमधून होत आहे.