बेकायदा दारूची वाहतूक करताना तिघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:06 AM2019-10-15T11:06:32+5:302019-10-15T11:08:31+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी सुरू केली असून, बेकायदा दारूची वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी दुपारी तिघांना पकडले. त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी सुरू केली असून, बेकायदा दारूची वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी दुपारी तिघांना पकडले. त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
वाढे फाटा येथील एका ढाब्यासमोर रिक्षा उभी असून, त्यामध्ये बेकायदा दारूचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे रविवारी दुपारी जाऊन छापा टाकला. रवी अंकूश सकटे, आदील खलील शेख (रा. आकाशवाणी केंद्राजवळ, सातारा) या दोघांना पोलिसांनी पकडले.
त्यांच्याकडून देशी दारूच्या बॉक्स आणि रिक्षासह ६४ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, घोरपडे, विलास नागे, ज्योतीराम बर्गे, विनोद गायकवाड, प्रवीण कडव यांनी केली.
दुसरी कावाई फलटणमध्ये करण्यात आली. मलटणहून बाणगंगा नदीच्या पुलामार्गे एकजण कारमधून (एमएच ०२ केए ७१४२) बेकायदा दारूची वाहतूक करत असल्याची माहिती रविवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी तेथे तत्काळ धाव घेऊन सापळा रचला. कारमधून निघालेल्या विकास संपत बाबर (रा. किकली, ता. वाई) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून कारसह विदेशी दारू, मोबाईल असा सुमारे १ लाख २९ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.