तीन महिला डॉक्टरांचा साताऱ्यात विनयभंग : महाबळेश्वरातही गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:19 PM2018-03-13T23:19:58+5:302018-03-13T23:19:58+5:30
सातारा/महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील डॉक्टरकडून रुग्ण महिलेचा तर साताऱ्यातील तीन शिकाऊ डॉक्टरांचा भर
सातारा/महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील डॉक्टरकडून रुग्ण महिलेचा तर साताऱ्यातील तीन शिकाऊ डॉक्टरांचा भर रस्त्यात पाठलाग करत हात धरल्याची घटना घडली. सातारा शहरमध्ये रमेश दुज्जा मुल्ला (अमरलक्ष्मी देगाव, ता. सातारा) व महाबळेश्वरमध्ये डॉक्टर भांगडिया यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी महिला व तिची मैत्रीण अशा दोघी मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथील एका सामाजिक संस्थेमार्फत वर्गणी गोळा करत होत्या. दरम्यान, फिर्यादी महिलेच्या पोटात अचानक दुखू लागले. महिलाही तानूू पटेल स्ट्रीट येथील डॉ. भांगडिया यांच्या दवाखान्यात गेल्या. त्यावेळी दवाखान्यात डॉक्टर व कंपाउंडर हे दोघेच उपस्थित होते. डॉक्टरांनी महिलेच्या मैत्रिणीला बाहेर थांबायला सांगितले. तर कंपाऊंडरला बाहेर तिकीट आणण्यास सांगितले.
दरम्यान, तपासणी करत असताना डॉक्टराने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तद्नंतर डॉक्टरांनी कागदावर औषधे लिहून दिली व पैसे देत असताना त्यांनी पैसे घेतले नाहीत. घडलेला प्रकार बाहेर आल्यावर सोबत असलेल्या महिलेस सांगितला व महाबळेश्वर पोलीस ठाण्यात डॉ. भांगडिया याच्याविरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस नाईक सुनीता डोईफोडे करीत आहेत.तर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करतात. ड्युटी संपल्याने घरी जात असताना मुथा कॉलनी रस्त्यावर रमेश मुल्ला हा नेहमी दुचाकीवरून येत पाठलाग करत असतो. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रमेश दुचाकीवर आला.
दुचाकी आडवी मारून डॉक्टर तरुणीचा हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तर दोन्ही शिकाऊ डॉक्टरांचा पाठलाग करत अश्लील हावभाव करत होता. याप्रकरणी तिन्ही शिकाऊ डॉक्टरांनी स्वतंत्र तीन फिर्याद दिल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी रमेश मुल्ला याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वंजारी करीत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
महाबळेश्वर येथील डॉ. नंदकिशोर भांगडिया यांची प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाबळेश्वरात ते स्वत:च्या दवाखान्यातून रुग्णसेवा बजावत आहेत. डॉक्टरी पेशा सांभाळत असतानाच त्यांनी २०११ ते २०१६ या कालावधीत महाबळेश्वर गिरिस्थान पालिकेचे स्वीकृत नगरसेवक म्हणूनही काम पाहिले आहे. डॉ. भांगडिया यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.