बादलीत बुडून तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:06 PM2020-02-04T12:06:14+5:302020-02-04T12:11:01+5:30
खेळता-खेळता बादलीत पडून तीन वर्षाच्या बालिकेचा दुर्देवी अंत झाल्याची घटना सातारा तालुक्यातील सोनगाव येथे सोमवारी दुपारी घडली. मृत बालिका ही कर्नाटक राज्यातील आहे.
सातारा : खेळता-खेळता बादलीत पडून तीन वर्षाच्या बालिकेचा दुर्देवी अंत झाल्याची घटना सातारा तालुक्यातील सोनगाव येथे सोमवारी दुपारी घडली. मृत बालिका ही कर्नाटक राज्यातील आहे.
चिनू यल्लाप्पा दोडमणी (वय ३, रा. ओवीअळी, ता. मुद्याहाळ. जि. विजापूर, राज्य कर्नाटक) असे दुर्देवी बालिकेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, यल्लापा दोडमणी हे वीटभट्टीवर काम करतात. दर वर्षी ते पत्नीसमवेत सोनगाव येथे काम करण्यासाठी येत असतात.
महिनाभरापूर्वी ते कुटुंबीयासमवेत सोनगाव येथे कामासाठी आले. दरम्यान, सोमवारी दुपारी यल्लापा हे घरात जेवण करत होते. त्यावेळी पत्नी यल्लामा या झोपडीसमोर कपडे धूत होत्या. कपडे धूऊन झाल्यानंतर बादलीमध्ये पाणी तसेच ठेवून त्या वीटभट्टीवर काम करण्यासाठी गेल्या. यावेळी तीन वर्षाची चिनू ही खेळत-खेळत बादलीजवळ आली.
बादलीतील पाण्यात हात घालून ती खेळत होती. त्यावेळी तिचा अचानक तोल गेल्याने ती बादलीत पडली. तोंड खाली आणि पाय वर झाले. बऱ्याच वेळ हा प्रकार कोणाच्या निदर्शनास आला नाही. जेवण करून वडील झोपडीतून बाहेर आले. त्यावेळी चिनूचे बादलीतून पाय वर दिसले. त्यांनी तत्काळ धाव घेऊन चिनूला बादलीतून बाहेर काढले. मात्र, चिनू निपचित पडली होती. मोटारसायकलवरून चिनूला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
यल्लाप्पा दोडमणी यांना दोन मुले व एकुलती एक मुलगी होती. तिचा अशा प्रकारे दुर्देवी मृत्यू झाल्याने दोडमणी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर चिनूचा मृतदेह अत्यंविधीसाठी कर्नाटकला नेण्यात आला.
आई पाणी ओतण्यास विसरली..
कपडे धुऊन झाल्यानंतर यल्लामा या नेहमी बादलीतून पाणी तेथील झाडांना ओतत होत्या. मात्र, सोमवारी घाईगडबडीत त्या बादलीतील पाणी ओतणे विसरल्या आणि कामावर निघून गेल्या. बादलीतील पाणी आपल्या मुलीचा कर्दनकाळ ठरेल, हे त्यांना वाटले नव्हते. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी बादलीतील पाणी ओतण्यास विसरल्याने स्वत:ला दोष देत आक्रोश केला.