तलाठ्याला मारहाण करणाऱ्याला तीन वर्षे शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 10:27 AM2019-12-21T10:27:36+5:302019-12-21T10:28:20+5:30
सातारा : वाळूचा अवैध उपसा सुरू असलेल्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला मारहाण करणाऱ्या श्रीधर उर्फ बाळू कल्याण खराडे (रा. ...
सातारा : वाळूचा अवैध उपसा सुरू असलेल्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला मारहाण करणाऱ्या श्रीधर उर्फ बाळू कल्याण खराडे (रा. ताथवडा, ता. फलटण) याला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याप्रकरणी तलाठी आत्माराम नाना गिऱ्हे (रा. गोळीबार मैदान, सातारा) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, ताथवडा येथील पुलाजवळ २३ फेब्रृवारी २०१६ रोजी झालेल्या अवैध वाळू उपशाचा पंचनामा करण्यासाठी तत्कालीन गाव कामगार तलाठी आत्माराम गिऱ्हे हे त्यांचे सहकारी दत्तात्रय जाधव यांच्यासमवेत घटनास्थळी गेले होते.
त्यावेळी आरोपी खराडे याने त्यांना पंचनामा करण्यास विरोध केला. त्यावर गिऱ्हे यांनी आपण शासकीय काम करत असल्याचे सांगत पंचानम्याला सुरूवात केली. त्यामुळे चिडलेल्या खराडेने गिऱ्हे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले होते.
जखमी गिऱ्हे यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गिऱ्हे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात श्रीधर खराडे याच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खराडेवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
या खटल्यात श्रीधर खराडे याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, उपनिरीक्षक एस.के. शिंगटे यांची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरली.
न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी श्रीधर खराडेला तीन महिने सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार मुस्ताक शेख यांनी काम पाहिले.