बाललैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला तीन वर्षे सक्तमजुरी
By दत्ता यादव | Published: January 22, 2024 07:58 PM2024-01-22T19:58:59+5:302024-01-22T19:59:10+5:30
सातारा : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के. व्ही. बोरा यांनी साेमवारी फलटण येथील एकाला तीन वर्षे सक्तमजुरी ...
सातारा : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के. व्ही. बोरा यांनी साेमवारी फलटण येथील एकाला तीन वर्षे सक्तमजुरी व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
तानाजी दौलत भगत (वय ५८, रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा), असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलीवर भगत याने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. पीडित मुलीच्या घरातल्यांनी याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक यू. एस. शेख यांनी या प्रकरणाचा तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने तानाजी भगत याला तीन वर्षे सक्तमजुरी व दीड हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील महेश शिंदे यांनी काम पाहिले.
उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून हवालदार साधना कदम, बडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाला पोलिस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक उदय दळवी, सुनील सावंत, सहायक फौजदार शशिकांत गोळे, हवालदार गजानन फरांदे, मंजूर मणेर, अमित भरते व शेख यांनी सहकार्य केले.