तीन वर्षांनंतर करतात गणेशमूर्तीचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:02 AM2019-09-11T00:02:22+5:302019-09-11T00:02:26+5:30
जगदीश कोष्टी । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सुखकर्ता तू दुखहर्ता ही गणरायाची ओळख. याला साजेसे काम साताऱ्यातील कृष्णेश्वर ...
जगदीश कोष्टी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सुखकर्ता तू दुखहर्ता ही गणरायाची ओळख. याला साजेसे काम साताऱ्यातील कृष्णेश्वर पार गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते करत आहेत. महाकाय गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यामुळे होणारे जलप्रदूषण लक्षात घेऊन मंडळाने एकदा प्रतिष्ठापना केलेली मूर्ती तीन वर्षे विसर्जित करायची नाही. त्याऐवजी छोट्या मूर्तीचे विसर्जन करायचे, असा निर्णय घेतला. ही परंपरा मंडळाने यंदाही जपली आहे.
व्यंकटपुरा पेठेतील या मंडळाची स्थापना १९६० मध्ये झाली. साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या या गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते समाजाला दिशादर्शक काम करत आहेत. विसर्जन मिरवणूक म्हटल्यावर कर्णकर्कश ध्वनिक्षेपक लावून मनसोक्त थिरकावे, असे तरुणांना वाटत असते; पण या मंडळाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी नव्या पिढीवर समाजकारणाचे संस्कार केले आहेत. त्यामुळेच कर्णकर्कश आवाज करणाºया वाद्यांना छेद देऊन पारंपरिक वाद्य स्वीकारणे सोपे गेले. जलप्रदूषणाएवढेच वायू प्रदूषण महत्त्वाचे आहे. ते टाळण्यासाठी गुलालविरहित मिरवणूक काढली जाते.
गेल्या महिन्यात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत आलेल्या महापुरामुळे हजारो ट्रक चालक अडकून पडले होते. त्यांच्यासाठी मंडळाने जेवणाची सोय केली होती. याबरोबरच व्यंकटपुरा पेठेत मुलांसाठी विविध स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गौरी सजावट स्पर्धा, दहीहंडी आदी उपक्रम राबविले जातात, अशी माहिती संजय पवार, संजय ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बोलेमामाच्या
कुटुंबाला मदत
काही वर्षांपूर्वी गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत भिंत पडल्यामुळे अनेकांचा बळी गेला. त्यावेळी बोलेमामाच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी ‘लोकमत’ने मोहीम हाती घेतली होती. त्यातही सहभागी होऊन या गणेश मंडळाने मदतीचा हात पुढे केला होता. मंडळाने यंदा घरोघरी जाऊन ‘प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका,’ असा आग्रह धरत कापडी पिशव्यांचे वाटप केले.