पोवई नाक्यावर तीन तरुणांचा सशस्त्र धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:47 PM2018-05-20T22:47:23+5:302018-05-20T22:47:23+5:30
सातारा : दुचाकी धडकल्याच्या रागातून येथील पोवई नाक्यावर तरुणांनी हातात गुप्ती घेऊन धिंगाणा घातला. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिघांनाही अटक केली. या घटनेमुळे पोवई नाका परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. ही घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
परशुराम उत्तम जाधव (वय २३), जीवन संजय पवार (२२ दोघे रा. रविवार पेठ, सातारा), सनी अशोक काटकर (२४, रा. शनिवार पेठ, सातारा) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोवई नाक्यावरील बढीया पेट्रोलपंपासमोरून हे तिघे दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुसºया दुचाकीस्वाराची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या तिघांनी त्या दुचाकीस्वारासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक वादावादी वाढल्यानंतर या तिघांपैकी एकाने कमरेला दडवलेली गुप्ती बाहेर काढली. काही वेळ गुप्ती हातात धरून त्यांनी दहशत माजवली. त्यामुळे हा प्रकार पाहणारे नागरिकही भयभीत झाले. भर वर्दळीच्या ठिकाणी युवक हातात शस्त्र घेऊन धिंगाणा घालत असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन गुप्ती जप्त केली. तिघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आर्म अॅक्टनुसार तिघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, याची फिर्याद स्वत: पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांकडून खातरजमा
अटक केलेले तिघे मद्यधुंद अवस्थेत होते, असे पोलिसांनी सांगितले. या तिघांपैकी एकाने नेमकी गुप्ती कशासाठी स्वत:जवळ ठेवली होती, याची पोलीस चौकशी करीत आहेत. यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का? याचीही पोलिसांकडून खातरजमा केली जात आहे.