कोयनेतील पाणीसाठा १०० टीएमसीच्या उंबरठ्यावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:47 AM2021-09-10T04:47:03+5:302021-09-10T04:47:03+5:30
सातारा : जिल्ह्यात चार दिवसांपासून चांगला पाऊस होत असून, पश्चिम भागात जोर वाढला आहे. यामुळे प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने ...
सातारा : जिल्ह्यात चार दिवसांपासून चांगला पाऊस होत असून, पश्चिम भागात जोर वाढला आहे. यामुळे प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने वाढत चालला आहे. तर कोयना धरणातील साठा ९८ टीएमसी झाला आहे. पूर्व भागातही चांगला पाऊस होत आहे. दरम्यान, गुरुवार सकाळपर्यंत कोयनेला ७१, तर महाबळेश्वरला ८१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
ऑगस्ट महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने सप्टेंबर उजाडताच चांगली सुरुवात केली आहे. त्यातच जिल्ह्यात आठवड्यापासून पाऊस होत आहे. मात्र, चार दिवसांत चांगलाच जोर वाढला आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, तापोळा, महाबळेश्वर भागात दमदार पाऊस होत आहे. यामुळे प्रमुख समजल्या जाणाऱ्या कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी धरणांत चांगला पाणीसाठा वाढू लागला आहे. यामुळे धरणे लवकरच भरू शकतात.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७१ मिलिमीटर पाऊस झाला, तर जूनपासून ३८३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे ४५ आणि यावर्षी आतापर्यंत ५११८ मिलिमीटर पाऊस पडला; तर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ८१ व जूनपासून ५१०१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर कोयना धरणात सकाळच्या सुमारास ९७.९२ टीएमसी पाणीसाठा झाला. १०५.२५ टीएमसी क्षमता असणारे कोयना धरण भरण्यासाठी जवळपास ७ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तर सकाळच्या सुमारास कोयना धरणात २९६३१ क्युसेक वेगाने पाणी येत होते.
दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागातही दमदार पाऊस होत आहे. माण, खटाव, फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होऊ लागलाय. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला. माण तालुक्यातील अनेक गावांच्या ओढ्यांना पाणी येऊ लागले आहे. तसेच बंधाऱ्यात पाणीसाठा होत आहे. तरीही अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.
चौकट :
धोममध्ये ८८, तर उरमोडीत ८३ टक्के पाणीसाठा...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस होत असल्याने प्रमुख धरणांतील पाणीसाठा वाढत चालला आहे. गुरुवारी सकाळच्यासुमारास धोम धरणात ८७.८९ टक्के पाणीसाठा झाला होता. कण्हेरमध्ये ९०, कोयनेत ९३, उरमोडी धरणात ८२.८९, बलकवडीत ९८ आणि तारळी धरणात ९१.८२ टक्के पाणीसाठा झाला होता, तर खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणात अवघा ४.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. खटाव तालुक्यात चांगला पाऊस झाल्यास धरण भरू शकते.
............................................................