खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 07:12 PM2024-09-22T19:12:47+5:302024-09-22T19:13:04+5:30
खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या तीव्र उतारावरून रविवारी ‘एस’ वळणावरून जाताना कंटेनर चालकाचा ताबा सुटला.
श्रीमंत ननावरे
खंडाळा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या ‘एस’ वळणावर रविवारी भरधाव कंटेनरने पुढील आठ गाड्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात सात कार व एका रिक्षाचा चुराडा झाला, तर पाच जण जखमी झाले. या अपघातामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.
खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या तीव्र उतारावरून रविवारी ‘एस’ वळणावरून जाताना कंटेनर चालकाचा ताबा सुटला. यामुळे कंटेनरने पुढे चाललेल्या सहा वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामुळे ही वाहने एकमेकांना धडकली. वास्तविक रविवारची सुटी असल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती.
अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिस तातडीने घटनास्थळी अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावून गेले. अपघातातील वाहने महामार्गावरून बाजूला करेपर्यंत पाठीमागे वाहन चालकांच्या बेजबाबदारपणामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यातून वाहनांना मार्ग काढताना अडचण येत होती. बोगद्यापर्यंत वाहनांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी खूप कसरत करावी लागली.
शिक्षक बचावले....
खंबाटकी बोगदा परिसरात झालेल्या या विचित्र अपघातात कारला (एमएच ११-एडब्ल्यू ७६७६) जोरदार धडक बसली. दोन्ही बाजूंनी कार चेपल्याने मोठे नुकसान झाले. सातारा येथील शिक्षक बँकेचा शताब्दी कार्यक्रम उरकून ते खंडाळ्याला निघाले होते. मात्र, या कारमधील पाच शिक्षक बचावले.