खांद्यावरून पाणी आणून आजोबा भागावताहेत तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:56 PM2018-04-26T22:56:37+5:302018-04-26T22:56:37+5:30
कुकुडवाड : वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावात श्रमदान सुरू असून, गाव पाणीदार होताना आपणही त्यामध्ये साक्षीदार राहावे, यासाठी वृद्धही मागे नाहीत. याच भावनेतून माण तालुक्यातील चिलारवाडीत ८५ आणि ९५ वयाचे आजोबा श्रमदान करणाऱ्यांची तहान भागविण्यासाठी धडपड करीत आहेत.
माण तालुक्यात वॉटर कप स्पर्धेंतर्गत अनेक गावांत काम सुरू आहे. अनेकजण हातात फावडे, टिकाव, पाटी घेऊन श्रमदान करतात; पण काहीजण हातात फावडे, टिकाव किंवा पाटी न घेता श्रमदान करत आहेत. तर काहीजण वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत आहेत.
तालुक्यातील चिलारवाडी गावातील ८५ वर्षांचे नाना रामा झुरळे व ९५ वय असणारे शंकर रामा घुटुकडे हे दोन आजोबा काठीचा आधार घेऊन पाणी आणत आहेत. खांद्यावर कळशी घेऊन पाणी आणत ते श्रमदान करणाºयांची तहान भागवत आहेत. त्यामुळे श्रमदान करणाºयांचाही उत्साह वाढत आहे.
तरुणांपुढे वृद्धांचा आदर्श...
कुकुडवाडजवळ चिलारवाडी हे एक छोटंसं गाव आहे. हे गाव पाणीदार होण्यासाठी येथील तरुण वर्ग, पुरुष, महिला, वृद्ध लोक श्रमदान करत आहेत.
काहीजण पिण्याचे पाणी श्रमदान करणाºयांना पुरवत आहेत. त्यामुळे येथील तरुणवर्ग वृद्धांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्रमदान करत आहेत.