आबांचा झंझावात; काँग्रेसला सुरुंग

By admin | Published: February 24, 2017 11:42 PM2017-02-24T23:42:04+5:302017-02-24T23:42:04+5:30

भुर्इंज गट : भाजपाच्या मतविभागणीने राष्ट्रवादी सुसाट; उमेदवारीपासून निकालापर्यंतचे ‘लोकमत’चे अचूक अंदाज

Thunderstorms; Congranged Congress | आबांचा झंझावात; काँग्रेसला सुरुंग

आबांचा झंझावात; काँग्रेसला सुरुंग

Next


महेंद्र गायकवाड ल्ल पाचवड
भुर्इंज गटातील विजयी उमेदवारीची माळ अखेर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश चव्हाण यांच्या गळ्यात पडली अन् मकरंद आबांच्या करिष्म्याने मागील निवडणुकीत काँग्रेसच्या ताब्यात गेलेला भुर्इंज गट पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात आला.
काँग्रेस व राष्ट्रवादीची उमेदवारी गुलदस्त्यात राहिलेल्या या गटाची कमान आमदार मकरंद आबांनी अखेरच्या क्षणी चिंधवलीचा क्रिकेटर व सर्व प्रकारच्या पीचवर विजय मिळवणाऱ्या शिलेदाराकडे दिली अन् नंतर चिंधवलीच्या ज्येष्ठ फळीने व तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जो धुरळा उडवला त्याचा अखेर गुलाल अंगावर घेऊनच झाला.
दरम्यान, काँग्रेसच्या गटातील उमेदवारीचा शेवटपर्यंत न मिटलेला घोळ, पक्षातील कार्यकर्त्यांच्या अंतर्गत गटबाजीचा फटका व भुर्इंज गट व गणात भाजपाच्या उमेदवारांकडून झालेली मतविभागणी काँग्रेसच्या उमेदवारांना मतपेटीतून उमजली असून, या सर्व बाबींवर मोठे मंथन करण्याची वेळ येथील काँग्रेस नेतृत्वावर आज आलेली आहे.
‘लोकमत’ने निवडणुकीपासूनच भुर्इंज गटाचे व भुर्इंज आणि पाचवड गणाचे अचूक वार्तांकन वाचकांसमोर मांडले. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेली संभाव्य उमेदवारांची वर्णी त्या-त्या पक्षाकडून झाली आणि प्रथमच भुर्इंज गटात मोठ्या ताकदीने उतरलेला भाजपाचा उमेदवार गटातील काँग्रेस व राष्ट्रवादीचा विजयी उमेदवार ठरवणार हा अंदाजही अचूक ठरला. भाजपाकडून लढणारे शशिकांत दगडे यांनी भुर्इंजमधील काँग्रेसचे हक्काचे मतदान हिसकावून घेतल्याने काँग्रेसकडून करण्यात आलेली मतांची गोळाबेरीज पूर्णपणे फोल ठरली.
काँग्रेसच्या प्रकाश धुरगुडे यांनी या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांसह स्वत:ला झोकून दिले होते. मात्र, संपूर्ण गटाची भिंगरी करणाऱ्या प्रकाश धुरगुडे यांना अंतिम क्षणी महत्त्वाचे गड आपल्या ताब्यात राखता न आल्याने काँग्रेसच्या हक्काच्या व निर्णायक मतांना सुरुंग लागला अन् गटातील निकालाचे चित्रच बदलून गेले.
भुर्इंज गटाबरोबरच वाई तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भुर्इंज गणामधील जबरदस्त लढतीत रजनी भोसले-पाटील यांच्यासाठी सुधीर भोसले-पाटील यांनी युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून गड सर केला. त्यामुळे भुर्इंज गणातही अखेर राष्ट्रवादीने बाजी मारली.
चिंधवलीने दाखवले एकीचे बळ
भुर्इंज गटातील यावेळच्या निवडणुकीत चिंधवली गावाने राजकारणात सुद्धा एकी होऊ शकते हे दाखवून दिले. ऐनवेळी चिंधवलीतील काही नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला असतानाही आपल्या गावचा उमेदवार जिल्हा परिषदेत जाणार म्हणून लहान-थोरापासून सर्वचजण आपापसातील गट-तट, हेवे-दावे विसरून एकत्र आले. ‘एकीचे बळ मिळते फळ’ या उक्तीला साजेशे काम यावेळी चिंधवलीकरांकडून झाले आहे. यावेळी झालेली एकी लवकरच होणाऱ्या चिंधवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपर्यंत राहिली तर ग्रामपंचायतही राष्ट्रवादीकडे म्हणजेच आमदार मकरंद आबांच्या विचारांची झाल्यास नवल वाटणार नाही.

Web Title: Thunderstorms; Congranged Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.