डोक्यात टिकटिक, काळजात धडधड!
By admin | Published: May 26, 2015 10:52 PM2015-05-26T22:52:49+5:302015-05-27T00:59:40+5:30
बारावी उत्तरपत्रिका गहाळ प्रकरण : पास - नापासचा आज फैसला; किती गुण मिळणार कळता कळेना
कऱ्हाड : इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल बुधवार दि. २६ मे रोजी लागत आहे; पण कऱ्हाडातून भौतिकशास्त्राच्या पाचशे उत्तर पत्रिका गहाळ झाल्या, त्या अद्याप सापडलेल्या नाहीत. त्यामुळे ‘त्या’ विद्यार्थ्यांच्या डोक्यात टिकटिक अन् काळजात धकधक वाढलीय, एवढे नक्की !परीक्षा बोर्डाचा भोंगळ कारभार नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत येतो. यंदाही मार्च महिन्यात बारावीची परिक्षा झाली. विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास करून, मेहनत करून परिक्षाही दिली. मात्र, कऱ्हाडात विज्ञान शाखेच्या भौतिकशास्त्र विषयांच्या सुमारे पाचशे उत्तरपत्रिकाच तपासण्यापूर्वी गायब झाल्याचा प्रकार‘लोकमत’ने समोर आणला. त्यामुळे शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. पालकांनी शिक्षण विभागात धाव घेतल्यावर आम्ही पोस्टात उत्तरपत्रिका पाठविल्या होत्या, असे सांगत त्याची पोहच दाखविली.प्रकरण अंगलट येतय म्हंटल्यावर पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरपत्रिका असणारे पोस्टाचे पार्सल हरविल्याची पोलिसांत तक्र ार दिली; पण तोवर खूप वेळ झाला होता. मग तपासाचा फार्स कागदावरच पूर्ण झाला. परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी थोडीशी शोधाशोध केली; पण यश काही आलेच नाही.कऱ्हाडातून हरवलेल्या पाचशे उत्तरपत्रिका नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यांच्या हे अद्याप समजू शकले नाही. त्यांच्या गुणदानाबाबत परीक्षा मंडळ नेमकी कोणती भूमिका घेणार हे कोणी खात्रीशिर सांगितले नाही. त्यामुळे विज्ञान शाखेच्या भौतिकशास्त्र विषयाचा पेपर लिहलेल्या कऱ्हाडच्या सर्वच विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय.बारावीचा निकाल बुधवार दि. २७ रोजी जाहीर होतोय, परीक्षा दिलेल्या सर्वच परिक्षांर्थींना निकालाची उत्सूकता आहे. पण कऱ्हाडात भौतिकशास्त्राचा पेपर दिलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना सध्या धाकधूक लागली आहे. डॉक्टर अन् अभियंता होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या या विद्यार्थ्यांना एक-एक गुण महत्वाचा आहे. पण त्यांच्या नशिबात अन् गुणपत्रिकेत काय होणार हे उद्याच कळणार आहे. (प्रतिनिधी)
चित्र अस्पष्टच...!
बारावीच्या कोल्हापूर बोर्डाचे सहायक शिक्षणाधिकारी शेटे यांच्याशी याबाबत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला, त्यांनीही संबंधित विद्यार्थ्यांना कसे गुणदान केले आहे. हे उद्याच स्पष्ट होईल असे सांगण्यात धन्यता मानली.