जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर तिकिटाची विक्री नगण्यच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:26+5:302021-07-02T04:26:26+5:30
लोणंद : कोरोनाच्या काळात आपल्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे, यासाठी ...
लोणंद : कोरोनाच्या काळात आपल्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे, यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे पुन्हा १६ जूनपासून प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर दहा रुपये करण्यात आले आहेत.
गेल्यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली होती. आरक्षित तिकीट काढलेल्या रेल्वे प्रवाशांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जात होता. लोणंद, वाठार, कोरेगाव, रहिमतपूर, कऱ्हाड, सातारा याठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीट काढणाऱ्यांची संख्या तशी नगण्यच आहे. मुंबई-पुणे या शहरांसारखी गर्दी सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवर नसल्याने प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याची गरजच पडत नाही. त्याचबरोबर या रेल्वे स्थानकावर पुरेसे कर्मचारी नसल्यानेही रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रत्येकाचे तिकीट कोण तपासणार, हाही प्रश्न आहेच. शिवाय एखाद्या स्थानिकाला विना प्लॅटफॉर्म तिकीट फिरताना पकडले तरी स्थानिकांना जाण्या-येण्यासाठी दुसरा मार्गही या रेल्वे स्थानकावर उपलब्ध नाही.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये रेल्वेने मुख्य द्वार बंद करून रेल्वे पोलिसांकडून फिरणाऱ्यांवर कारवाई केली होती. कोरोनापूर्वी तर लोणंद रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणजे लोणंदच्या नागरिकांचा वॉकिंग ट्रॅकच होता. दररोज सकाळी व संध्याकाळी या प्लॅटफॉर्मवर शेकडो नागरिक चालण्यासाठी येत होते.
(चौकट..)
विना प्लॅटफॉर्म तिकीट नागरिकांचा प्रवास
लोणंद शहरातील रेल्वे स्थानक गावाच्या मध्यावर असल्याने मार्केट यार्ड, शाळा, कॉलेज, इंदिरानगर, बाळासाहेब नगर, कोरेगाव, कापडगाव याठिकाणी चालत जाणाऱ्या नागरिकांना रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरूनच जाण्याचा मार्ग जवळचा असल्याने विना प्लॅटफॉर्म तिकीट नागरिक रेल्वे स्थानकावरून ये-जा करताना दिसतात. त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकीट वाढले काय आणि कमी झाले काय, याचा संबंध सातारा जिल्ह्यातील प्रवाशांवर होत नाही.