Satara: महाबळेश्वरच्या जंगलातील पट्टेरी वाघाची शिकार; कातडी, नखे तस्करीसाठी मुंबईला गेलेले तिघे गजाआड
By दीपक शिंदे | Published: September 19, 2023 11:36 AM2023-09-19T11:36:30+5:302023-09-19T11:36:50+5:30
वनविभागाची कारवाई
महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या जंगलातील पट्टेरी वाघाची शिकार करून त्याची कातडी व नखांची तस्करी करण्यासाठी मुंबईला गेलेल्या तीनजणांना सापळा रचून मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दहा लाख रुपये किमतीची वाघाची कातडी व नखांचा पंजा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तिघांवर एमएचबी कॉलनी पोलिस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल केला आहे.
सूरज लक्ष्मण कारंडे (वय ३०, रा. बिरवाडी, ता. महाबळेश्वर), मोहसीन नजीर जुंद्रे (३५, रा. रांजणवाडी, महाबळेश्वर) व मंजूर मुस्तफा मानकर (३६, रा. नगरपालिका सोसायटी, महाबळेश्वर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तिघांवर भारतीय दंड विधान ९, ३९ चा ३, ४४, ४८ अ , ४९ ब, ५१ वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलिस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांना महाबळेश्वर येथील काही लोक पट्टेरी वाघाची कातडी व वाघ नखांची तस्करी करण्यासाठी एलआयसी मैदान, बोरिवली पश्चिम येथे येणार असल्याची माहिती मिळाली. बोंबे यांनी ती वरिष्ठांना कळविली. कारवाईचे आदेश मिळतात पोलिस पथकाने सापळा रचला. वाघाची कातडी व नखे विक्रीसाठी आलेल्या तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. वाघाची सोलून काढलेली काळ्या-पिवळ्या रंगाचे पट्टे असलेली ११४ सेंटिमीटर लांब व १०९ सेंटिमीटर रुंद कातडी व त्यासोबत बारा वाघनखे असा साधारण १० लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ब्लॅक पँथरचेही दर्शन
महाबळेश्वरच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर बिबट आहेत; परंतु पट्टेरी वाघ दिसत नाही. वनविभागाचे अधिकारी जंगलात पट्टेरी वाघ नाहीत, असे सांगतात; परंतु या शिकार प्रकरणाने महाबळेश्वरच्या जंगलात पट्टेरी वाघ असल्याचे सिद्ध होत आहेत. यापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याला पारगावाच्या शिवारात ब्लॅक पँथर काही लोकांनी पाहिला होता; परंतु त्यानंतर तो पँथर पुन्हा दिसला नाही.