‘वाघ’वस्तीत बिबट्यासाठी वनखात्याकडून पिंजरा...
By admin | Published: July 23, 2016 11:32 PM2016-07-23T23:32:05+5:302016-07-25T18:14:15+5:30
हालचाली जोरात : वन्यजीव संरक्षण विभागाकडून परवानगी
ऑनलाइन लोकमत
खंडाळा, दि. २३ : ‘अंदोरी परिसरामध्ये दिसून आलेल्या बिबट्याचा वावर रुई-वाठार बु।।, होडी, भादे याठिकाणी राजरोसपणे सुरू आहे. बिबट्याचे वास्तव्य आज इथे तर उद्या तिथे असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. मात्र, बिबट्याचा प्रवास बिनधास्त आहे. वनविभागाच्या पथकाने वाठार बु।। शिवारात सापळा रचला असून, आता बिबट्याच्या प्रतीक्षेत अधिकारी आहेत. मात्र, बिबट्याच्या उत्सुकतेपोटी ग्रामस्थांची होणारी गर्दी त्याला पकडण्यामागे अडचण ठरत असल्याने लोकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी,’ असे आवाहन वनक्षेत्रपाल ए. व्ही. शिंदे यांनी केले आहे.
अंदोरी येथे गेल्या रविवारी बिबट्याचे पहिल्यांदा दर्शन झाले. त्यानंतर दोन दिवस याच भागात त्याचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले. वनविभागाच्या पथकाचा शोध सुरू असतानाच भादे परिसरातील होडी शिवारात आणि त्यानंतर वाठार बु।। येथील वाघवस्ती शिवारातही लोकांना बिबट्या त्याच्या बछड्यासह नजरेस पडला. त्यामुळे अंदोरी, वाठार, होडी, भादे या वीर धरणाच्या नीरा उजव्या कालव्याच्या परिसरातून बिबट्या वावरत असल्याचे समोर आले आहे.
अन्न आणि पाणी यांचा संगम या भागात आहे. दाट झाडीचा प्रदेश बिबट्यासाठी वरदान ठरतोय; मात्र त्याचे हेच वास्तव्य ग्रामस्थांना डोकेदुखी ठरत आहे. सहा दिवसांपासून वनविभागाचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भागात तळ ठोकून संपूर्ण भाग पिंजून काढला. मात्र, बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन त्यांना झाले नाही. पण लोकांना नजरेस पडल्यानंतर होणारी खळबळ ऐकून त्या भागात वनअधिकाऱ्यांना पोहोचावे लागत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, शनिवारी वनविभागाला वन्यजीव संरक्षण विभागाची परवानगी मिळाल्याने त्यांनी वाठार येथे वाघवस्ती परिसरात पिंजरा लावला आहे. परंतु अद्याप तरी हाती काहीच लागले नाही. दिवसभरात दडून बसलेला बिबट्या अंधार पडू लागताच शिवारात फिरत असल्याने शेतातून घरी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या नजरेस पडत आहे. त्यामुळे पिंजऱ्याच्या उपयोग रात्रीच होईल, अशी शक्यता आहे. वास्तविक बिबट्याच्या दहशतीतून बाहेर पडण्यासाठी या गावांमधील शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगली पाहिजे. बिबट्याचे वास्तव्य जेथे आहे तेथे गोंगाट न करता वनविभागाला काम करू दिले पाहिजे. तरच पिंजऱ्याचा उपयोग होईल.
वाघांच्या वस्तीला बिबट्याचा पिंजरा...
वाठार बुद्रुक येथे बिबट्याचे अस्तित्व दिसून आले होते. त्यामुळे वनविभागाने आता येथील वाघ वस्तीजवळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. जेथे पिंजरा लावण्यात आला आहे. तेथे वाघवस्ती आहे. येथील लोकांचे आडनाव वाघ असे आहे.