व्याघ्र प्रकल्पावरून पाटणमध्ये जुंपली!
By admin | Published: May 24, 2015 09:47 PM2015-05-24T21:47:50+5:302015-05-25T00:36:33+5:30
जनता संभ्रमात : दोन्ही नेत्यांच्या कोयनानगरला वाऱ्या
अरुण पवार- पाटण -सन १९८५ मध्ये कोयना व चांदोली अभयारण्यांची अधिसूचना निघाली. तेव्हा पाटणच्या वन्यप्राण्यांचा व वनविभागाचा त्रास होत आहे, अशी कोणतीही प्रतिक्रिया उमटत नव्हती. मात्र, या दोन्ही अभयारण्यांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारतोय याची चाहूल लागताच पाटणच्या विशेषत: कोयना विभागातील जनतेच्या मनावर विरोधाची सल उभी राहिली. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनवरून पाटणचे आजी-माजी आमदार एकमेकांवर आरोप करण्यात मग्न असून, या दोन्ही नेत्यांचा सभा कोयनानगर येथे सतत सुरू आहेत. त्यामुळे नक्की कोणाचे ऐकायचे, या संभ्रमात कोयना विभागातील जनता आहे.
‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती आमदार आणि मंत्री असताना झाली. त्यावेळी पाटणकरांनी विरोध का केला नाही. आता मात्र विरोधाचा पुळका दाखवून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा केविळवाणा प्रयत्न पाटणकर करीत आहेत, असा आरोप शंभूराज देसाई करत आहेत,’ असे विक्रमसिंह पाटणकर एकीकडे सांगत आहेत.
त्यावर आक्रमक होऊन मी सातारा येथे राहत असलो तरी पाटणची जनता माझ्या ह्दयात आहे. मी जनतेची किती कामे केली हे १९ हजारांच्या मताधिक्याने निवडून देणाऱ्या जनतेला ज्ञात आहे. तुम्ही पाटणच्या जनतेला किती त्रास दिला किंवा पाटणमध्ये राहून जनतेचा त्रास किती कमी केला याचे उत्तर आमने-सामने येऊन द्यावे, असे आवाहन शंभूराज देसार्इंनी केले आहे.
त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावरून आजी-माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे पाटणच्या जनतेची दोन्ही नेते एकप्रकारे करमणूक करत आहेत, अशीच चर्चा सुरू आहे.
कौन सच्चा.. कौन झुठा ?
कोयना भूकंप पुनर्वसन निधी, भूकंपग्रस्तांना दाखले मिळण्याबाबतचा न्यायालयाचा निकाल असो किंवा एकाच कामाची दोन भूमिपूजने, उद्घाटन असो. याबाबत पाटण तालुक्यात विक्रमसिंह पाटणकर व शंभूराज देसाई हे दोन्ही नेते चर्चेत आहेत. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा वाद व श्रेयवाद सुरू आहे. याचा निर्णय काय होतो आणि पाटणच्या जनतेचे समाधान कोण करते? किंवा व्याघ्र प्रकल्पातील जाचक अटीतून जनतेची सुटका कोण करणार? हे आगामी काळात समजणार आहे.