‘वाघ’वस्तीतल्या बछड्याची उत्तुंग भरारी

By Admin | Published: May 11, 2016 10:40 PM2016-05-11T22:40:23+5:302016-05-11T23:56:36+5:30

तुषार वाघ : पहिल्या प्रयत्नात ‘यूपीएससी’ परीक्षेत घवघवीत यश

'Tigers' festoon festoon | ‘वाघ’वस्तीतल्या बछड्याची उत्तुंग भरारी

‘वाघ’वस्तीतल्या बछड्याची उत्तुंग भरारी

googlenewsNext

सातारा : लहानपणी वस्तीत खेळून मराठी माध्यमातून शिक्षण घेणारा... पुढे हुशार म्हणून अभियांत्रिकीकडे वळलेला... नंतर प्रयत्न म्हणून स्पर्धा परीक्षा देऊन तहसीलदार पदावर विराजमान झालेला... आणि आत्ता तर चक्क पहिल्या प्रयत्नातच ‘युपीएससी’त यश मिळविणारा तुषार मोहन वाघ! खटाव तालुक्यातील वाघवस्तीतील या अवघ्या चोवीस वर्षांच्या बछड्याने ग्रामीण भागातही खूप टॅलेंट असल्याचे सिद्ध केले आहे.
खटाव तालुक्यातील वाघवस्तीत माध्यमिक शिक्षकाच्या घरात जन्मलेला तुषार पहिल्यापासूनच हुशार विद्यार्थी होता. मात्र, अभ्यासाबरोबरच त्याचा सामाजिक जाणिवांचा आवाका मोठा होता. मराठी माध्यमातून ९२ टक्के मिळवून दहावी झाल्यानंतर त्याने विज्ञान शाखेची निवड केली. त्यानंतर अभियांत्रिकी शाखेकडे जाण्यासाठी त्याने पुणे गाठले. कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर तो करिअरच्या नवनवीन संधी शोधत होता. आपण स्पर्धा परीक्षा देऊ असा निश्चय त्याने केला. अभियांत्रिकी पदवी मिळाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात तो ‘एमपीएससी’ उत्तीर्ण झाला.
त्यातून त्याची शेवगाव, ता. अहमदनगर येथे प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. शासन सेवेत कार्यरत असताना आलेल्या अनुभवातून त्याने ‘युपीएससी’ करण्याचा निश्चय केला. जिद्दी आणि चिकाटीला मिळालेली बुद्धीची जोड यामुळेच तुषारने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. हे यश मिळविणारा तो पहिला खटाववासीय झाला आहे. आपल्या यशाचे श्रेय तो कुटुंबीयांच्या पाठिंब्याला देतो. (प्रतिनिधी)


आपल्याकडे अजूनही महिला आणि बालकांच्या आरोग्याविषयी पुरेशी जनजागृती नाही. युपीएससीच्या माध्यमातून मिळालेल्या पदावरून मला या विषयात काम करायला आवडेल. याबरोबरच ग्रामीण भागात उघडपणे आणि शहरात दडून असणाऱ्या जात व्यवस्थेवरही काम करण्याची इच्छा आहे. आपल्या भागात निर्मल भारतच्या माध्यमातून क्रांतीकारक बदल घडविण्याचाही कायम प्रयत्न असणार आहे.
- तुषार वाघ, वाघवस्ती, खटाव


घरातील चारही मुलांची अतिउच्च ध्येयप्राप्ती
वाघवस्ती (वरूड) ता. खटाव येथील तुकाराम व पारूबाई वाघ यांना मोहन आणि मच्छिंद्र ही दोन मुले. यातील मोहन हे माध्यमिक शिक्षक तर मच्छिंद्र प्रगतशील शेतकरी. मोहन यांची पत्नी मालन यांनी लग्नानंतर बी.ए. बी. एड. चे शिक्षण पूर्ण केले. मात्र, घरातील पाच मुलांसाठी त्यांनी कुठेही नोकरी स्वीकारली नाही. मोहन यांना रेश्मा, सुषमा आणि तुषार ही तीन मुले तर मच्छिंद्र यांना नीलिमा आणि मंदार ही दोन मुले. यातील रेश्मा एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट आॅफिसर आहे, तर सुषमा प्राध्यापक आहे. तुषार पहिल्या प्रयत्नात ‘युपीएससी’त झळकला तर नीलिमाची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेत निवड झाली आहे. पुढील महिन्यात तिला नियुक्त पत्र मिळणार आहे. मंदार पुण्यात शिक्षण घेत आहे. कुटुंबीयांचे संस्कार आणि मुलांचे कष्ट यामुळे वाघवस्तीतील ही चारही मुलं उच्च ध्येयापर्यंत पोहोचली.

Web Title: 'Tigers' festoon festoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.