रुपया न देता पारदर्शी पद्धतीने राज्यात शिक्षक भरती : तावडे शिक्षक दिन कार्यक्रम; राम कदम यांच्या विषयावर उद्या बोलू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:50 PM2018-09-05T23:50:12+5:302018-09-05T23:51:54+5:30
आमच्या भूमिकेमुळे आर्थिक शोषण करून घेणारा शिक्षक संस्थाचालकांच्या कचाट्यातून मुक्त झाला आहे. एक रुपया न देता पारदर्शी पद्धतीने शिक्षक भरती होणार, हे महाराष्ट्रात घडणार आहे,’ अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
सातारा : ‘आमच्या भूमिकेमुळे आर्थिक शोषण करून घेणारा शिक्षक संस्थाचालकांच्या कचाट्यातून मुक्त झाला आहे. एक रुपया न देता पारदर्शी पद्धतीने शिक्षक भरती होणार, हे महाराष्ट्रात घडणार आहे,’ अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. दरम्यान, यावेळी त्यांनी आमदार राम कदम यांच्या वक्तव्यावर आज शिक्षक दिन आहे, यावर उद्या बोलू, असे सांगून विषयावरच पडदा टाकला.
सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहातील राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी घाटकोपरचे आमदार राम कदम यांच्या महिलांच्या बाबतीतील आक्षेपार्ह वक्तव्याचा राजकीय छळवाद शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने अनुभवला. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा आधी घेराव त्यानंतर प्रसारमाध्यमांकडून झालेली विचारणा यामुळे तावडेंना खूपच सारवासारव करावी लागली. ‘आज शिक्षक दिन आहे, त्यामुळे कदमांच्या विषयावर उद्या बोलू,’ असे सांगत शिक्षणमंत्र्यांनी आपली सुटका करून घेतली.
यावेळी मंत्री तावडे म्हणाले, ‘अनुदानित संस्थांचा अपवाद वगळता स्थानिक स्वराज्य संस्था, समाजकल्याण, आदिवासी प्रकल्प विभाग व खासगी शिक्षण संस्थांच्या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. राज्यात जे दोन कोटी विद्यार्थी शिक्षण घेतात ती पिढी देशाच्या रचनेत मोठा हातभार लावणार आहे. म्हणून आजचे तब्बल १०६ पुरस्कार राज्यातील तमाम पाच लाख शिक्षकांना समर्पित आहेत.
ज्या शिक्षण संस्थांना कागदावरच अनुदान मिळत होते. त्यांना २० टक्के अनुदान देण्याची भूमिका शासनाने गेल्या दोन वर्षांत घेतली आहे. कायम विनाअनुदानितचा कायम शब्द हटविल्यानंतर अनुदान देण्याचा निर्णय झाला.
राज्यातील शिक्षक भरतीच्या संदर्भात छेडले असता विनोद तावडे म्हणाले, ‘जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, समाजकल्याण व आदिवासी कल्याण विभागाची भरती प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल. त्यासंदर्भात भरती फॉर्म अपलोड करण्याचे काम सुरू आहे. काही अनुदानित खासगी शिक्षण संस्था कोर्टात गेल्या. मात्र, आमच्या भूमिकेमुळे आर्थिक शोषण करून घेणारा शिक्षक संस्थाचालकांच्या कचाट्यातून मुक्त झाला आहे.
साताऱ्यातील शिक्षक बदलीचा प्रश्न...
सातारा जिल्ह्यात झालेल्या बदल्यांमध्ये काही शिक्षकांवर चुकीच्या पद्धतीने आरोप झाले. याकडे मंत्री तावडे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘ग्रामविकास मंत्र्यांच्या अखत्यारितीतील ही बाब आहे. त्यावर मंत्री पंकजा मुंडे योग्य निर्णय घेतील,’ असे सांगितले.