घरगुती पीठगिरणी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:12+5:302021-04-03T04:35:12+5:30
चाफळ : वाढत्या घरगुती घरघंटीमुळे ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या पिठाच्या गिरण्यांना अखेरची घरघर लागली आहे. प्रत्येकाच्या घरात घरगुती ...
चाफळ : वाढत्या घरगुती घरघंटीमुळे ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या पिठाच्या गिरण्यांना अखेरची घरघर लागली आहे. प्रत्येकाच्या घरात घरगुती पिठाच्या घरघंटी आल्यामुळे मोठ्या पीठगिरणी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अलीकडच्या आधुनिक व धावपळीच्या या काळात नवनवीन तंत्राचा वापर वाढू लागला आहे. त्यानुसार, लोकही ते आत्मसात करत आहेत. पूर्वी गिरणी व्यवसाय हा फायदेशीर मानला जात होता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता किमान दोन लाख रुपये भांडवलाची आवश्यकता भासते. एवढे भांडवल घालून फायद्याची खात्री नसते. कारण लोकांचा घरगुती आटाचक्की खरेदीकडे कल वाढू लागला आहे. या घरगुती आटाचक्क्या बाजारात सात हजारांपासून पंधरा हजारांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे घरोघरी या गिरण्या पाहायला मिळत आहेत. परिणामी, मोठ्या गिरणीकडे दळण दळण्यासाठी येणाऱ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. व्यवसाय होत नसल्याने अनेकांना गिरणीचे वीजबिल भरणेही मुश्किल झाले आहे. परिणामी, काहींनी तर आपले व्यवसायही बंद केले आहेत. व्यावसायिक गिरणीचे दळण दळण्याचे दर ग्रामीण पंधरा रुपये पायली, तर शहरीसाठी २५ रुपये पायली असे आहेत, तसेच यामध्ये नैसर्गिक पद्धतीने दळण दळले जाते. या गिरणीमध्ये दगडी जाते असल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो व भाकरी चपाती दर्जेदार बनते, तसेच ती आरोग्यास उत्तम असते, परंतु आत्ताच्या धावपळीच्या युगात घराबाहेर जाऊन दळण दळणे हे लोकांना त्रासाचे वाटत आहे.
चौकट..
गिरण्या नामशेष होणार का?
वेळ खर्च होतो आहे. परिणामी, वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी, तसेच घरीच गिरण घेऊन बिना कटकटीचे दळण दळण्यास त्यांच्याकडून अधिक पसंती दिली जाते आहे. त्यामुळे व्यावसायिक गिरण्या नामशेष होणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. घरगुती गिरणीमुळे मोठे गिरणी व्यवसाय आता तोट्यात चालले आहेत.
कोट..
ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे पहिल्यासारखा आता व्यवसाय होत नाही. त्यामुळे वीजबिल भरणे ही कठीण झाले आहे. हळूहळू बेकारीची कुऱ्हाड आमच्यावर कोसळते की असे वाटू लागले आहे.
- शशिकांत माने, गिरणी व्यावसायिक, चाफळ