कोरोनामुळे घडशी समाजावर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:40 AM2021-04-24T04:40:12+5:302021-04-24T04:40:12+5:30

फलटण : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजअखेर कोणताही न्याय सवलत व इतर सुविधा न मिळणारा समाज म्हणजे महाराष्ट्रातील घडशी ...

A time of famine on the Ghadashi community due to the corona | कोरोनामुळे घडशी समाजावर उपासमारीची वेळ

कोरोनामुळे घडशी समाजावर उपासमारीची वेळ

Next

फलटण : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजअखेर कोणताही न्याय सवलत व इतर सुविधा न मिळणारा समाज म्हणजे महाराष्ट्रातील घडशी समाज असून, सध्या कोरोनामुळे आमच्या समाजातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारने तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार यांनी केली आहे.

पूर्वीपासून देवस्थानांमध्ये सनई-चौघडा, नगारा वाजवणे, लग्न समारंभामध्ये सनईवादन बँड, बेंजो, मावळा ग्रुप यासारखी कामे करणे फुलांचे हार बनविणे या व्यवसायावर आमच्या समाजाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र सध्या सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून, आमच्या समाजातील अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे राज्य सरकार व सर्वच समाजातील दानशूर व्यक्तींनी आम्हाला मदत करून दिलासा द्यावा, असे पवार यांनी सांगितले. पूर्वीपासूनच गरिबीत जीवन जगणारा हा समाज भूमिहीन आहे. त्यामुळे वरील व्यवसायावरच कसेबसे जीवन जगतो व या व्यवसायावर अवलंबून असतो. समाजात दररोज रोजी-रोटीचा प्रश्न असल्यामुळे शिक्षणाचे प्रमाण कमी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच लोक सरकारी, खासगी नोकऱ्यांमध्ये आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे कोणताही व्यवसाय चालला नाही. सरकारी कोणतीही मदत समाजाला मिळाली नाही. भूमी नाही, शिक्षणाची इच्छा असून, घरची परिस्थिती बेताची, त्यामुळे शिक्षणाचा अभाव, त्यामुळे सरकारी बँकेचे लोन व्यवसायाला मिळत नाही. मग या स्पर्धेच्या युगात टिकून राहून व्यवसाय चालावे, यासाठी खासगी कर्ज काढून वरील व्यवसायात गुंतवणूक केली. कोरोनामुळे ते कर्जही फिटले नाही. जवळची जी काही थोडी पुंजी होती, तिची मोडतोड करून कसंतरी जीवन जगावं लागलं. व्यवसाय ठप्प असल्याने मुलांच्या शिक्षणाच्या फीसाठीसुद्धा खूपच तारांबळ झाली. कसंतरी आत्तापर्यंत कुटुंब जगवलं. शहरातील समाजबांधवांचे तर खूपच हाल झाले. पुढे चांगले दिवस येतील, ही आशा घेऊन कसंतरी दिवस ढकलले; परंतु याहीवर्षी कोरोनाने डोकं वर काढलं आणि समाज पुरता कोलमडून पडला असून, सलग दोन वर्षे कोरोनाने सगळंच ठप्प झालं आहे.

इथून पुढे कसं जगायचं, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट..

समाजातील एकही शासनात पदाधिकारी नाही. त्यामुळे आमच्या समाजाची दखल घेतली जात नाही, अशी खंत अनिल पवार यांनी बोलून दाखवली. शासनाकडून समाज दुर्लक्षित आहे. गेली दोन वर्षे कसेबसे जीवन जगत आहे. प्रचंड ओढाताण, हाल-अपेष्टा हा समाज भोगत आहे. तरी शासनाला विनंती आहे की, समाजाची दखल घेऊन समाजाला दानशूर व्यक्तींना काहीतरी मदत करावी.

- अनिल पवार, प्रदेशाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज

Web Title: A time of famine on the Ghadashi community due to the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.