बाकी साडेचार वर्षे यांनाच हुडकायची वेळ जनतेवर येते, शिवेंद्रसिंहराजेंचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 07:27 PM2022-01-01T19:27:52+5:302022-01-03T11:15:04+5:30
सातारा : काही लोकांना नागरिकांच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नसते. पण, निवडणूक जवळ आली की, अशा लोकांना राजकीय स्वार्थ स्वस्थ ...
सातारा : काही लोकांना नागरिकांच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नसते. पण, निवडणूक जवळ आली की, अशा लोकांना राजकीय स्वार्थ स्वस्थ बसू देत नाही आणि मग हेच लोक जनतेबद्दल खोटा कळवळा आणून मोठमोठ्या थापा मारतात. मात्र जनता सुज्ञ झाल्याने अशा भूलथापांना भुलण्याचे दिवस गेले आहेत, असे उद्गार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
शाहूपुरीसाठीच्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या जलपूजन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते पाच सुवासिनींना जलकुंभ देऊन या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच सुमारे दहा वर्षांपूर्वी दूषित पाण्यामुळे मृत्यू पावलेल्या सात महिन्यांच्या गर्भवती भगिनीच्या पवित्र स्मृतीस ही योजना समर्पित करण्यात आली.
यावेळी नगरसेवक अविनाश कदम, शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले, उप कार्यकारी अभियंता माने, योजनेचे अभियंता एस. आर. अग्रवाल, मेंटेनन्स प्रमुख आवळे, योजनेचे ठेकेदार दीपक भिवरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रकुमार मोहिते ,नवनाथ जाधव, सुहास वहाळकर उपस्थित होते.
कण्हेर धरण बांधकामावेळी स्व. भाऊसाहेब महाराजांनी दूरदृष्टी ठेवून भविष्यात सातारा शहर व परिसरासाठी कण्हेरच्या पाण्याची गरज लागू शकते, यासाठी धरणस्थळी स्वतंत्र तांत्रिक तरतूद केल्यानेच आज एवढ्या सहजासहजी या पाणी योजनेचा लाभ होत आहे.
मध्यंतरीच्या काळात दिलीप सोपल पाणीपुरवठामंत्री असताना ही ३१ कोटींची योजना मी स्वतः पाठपुरावा करून मंजूर करून घेतली होती. सुदैवाने लोकवर्गणीची अट रद्द झाल्याने ही योजना मार्गी लागण्यातील मुख्य अडथळा दूर होऊन नंतर लागणारा अतिरिक्त १२ कोटींचा निधी सुध्दा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मंजूर करून घेतला व त्याची फलश्रुती म्हणून आज या योजनेचे पाणी प्रत्यक्षात शाहूपुरीत येऊन दाखल झाले आहे.
काहींना विकासाशी काहीही घेणे-देणे नाही. यांना नागरिक फक्त निवडणूक आली की दिसतात, बाकी साडेचार वर्षे यांनाच हुडकायची वेळ जनतेवर येत असते, असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.