पाऊस बनला काळ; गिळून टाकला गाव, गावपंढरी सोडावी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:11 PM2019-08-22T12:11:22+5:302019-08-22T12:16:35+5:30
यंदाच्या पावसाळ्याने कहर केला. कऱ्हाड, पाटण, वाई, सातारा या चार तालुक्यांत या पावसाने हाहाकार उडवून दिला. अनेक डोंगरांना तडे गेले तर रस्ते खचले. पाऊस बनला काळ अन् गिळून गेला गाव, असं म्हणण्याची वेळ आपत्तीग्रस्तांवर येऊन ठेपली. पाटण तालुक्यातील जिमनवाडी, महारवंड, बाटेवाडी या गावांतील लोकांना अतिवृष्टीमुळे कायमचे आपले गाव सोडावे लागणार आहे.
सागर गुजर
सातारा : यंदाच्या पावसाळ्याने कहर केला. कऱ्हाड, पाटण, वाई, सातारा या चार तालुक्यांत या पावसाने हाहाकार उडवून दिला. अनेक डोंगरांना तडे गेले तर रस्ते खचले. पाऊस बनला काळ अन् गिळून गेला गाव, असं म्हणण्याची वेळ आपत्तीग्रस्तांवर येऊन ठेपली. पाटण तालुक्यातील जिमनवाडी, महारवंड, बाटेवाडी या गावांतील लोकांना अतिवृष्टीमुळे कायमचे आपले गाव सोडावे लागणार आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात आत्तापर्यंत १५ हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सरासरीच्या सहापट पाऊस पडला आहे. या पावसामुळे नद्या, ओढ्यांना पूर आले. अनेकजण पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर घरे पडल्याने अनेकांना जीवाला मुकावे लागले. अतिवृष्टीग्रस्त भागातील वृद्धांचेही मृत्यू मोठ्या प्रमाणामध्ये झाले.
कोयना, कृष्णा, वेण्णा, तारळी, उरमोडी या नद्या संपूर्ण जिल्ह्याच्या जीवनदायिनी मानल्या जातात. मात्र, याच नद्या काळ बनून वाहत राहिल्या. नदीकाठची घरे, गोठे, कसदार जमिनी पाण्याखाली गेल्या. जमिनीची पाणी धार क्षमता संपल्याने पावसाचे पाणी वाट मिळेल तिकडे वाहत होते. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील टोळेवाडी, मोरेवाडी, जिमनवाडी, महारवंड, बाटेवाडी या गावांच्या जवळ असलेले डोंगर धोकादायक बनले. ज्या डोंगरांवर येथील स्थानिक लोकांनी गुरे चारली. त्यांची मुलं बाळं या डोंगराच्या छातीवर खेळली, तेच डोंगर आता काळ बनून उभे आहेत.
हे डोंगर कधीही कोसळू शकतात, ही भीती असल्याने लोकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने पायथ्याच्या गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिमनवाडी, महारवंड, बाटेवाडी या पाटण तालुक्यातील गावांत असणारे सध्याचे गावठाण राहण्यासाठी असुरक्षित बनले आहे.
लोकांचा, जनावरांचा जीव महत्त्वाचा असल्याने प्रशासनाने या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्तावर तयार केला असून, तो शासनाकडे पाठविला आहे. या गावातील १७० कुटुंबांना कायमस्वरुपी निवारा तेव्हाच उपलब्ध होईल, जेव्हा त्यांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन होईल. या लोकांना १७ प्रकारच्या नागरी सुविधाही पुरवाव्या लागणार आहेत.
दरम्यान, आपली शेती, जनावरे, शाळा ज्या परिसरात आहेत, त्याच ठिकाणी राहण्याची प्रत्येकाची मानसिकता असते. आता शासन ज्या ठिकाणी पाठवेल, त्या ठिकाणी संसार भरून त्यांना न्यावा लागणार आहे. पुनर्वसनाचे प्रश्न जिल्ह्यामध्ये रखडले असताना या आपत्तीग्रस्तांची त्यात भर पडणार आहे.
शासकीय जमीन उपलब्ध नसेल तर या लोकांसाठी खासगी लोकांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत, त्यामुळे आगामी काळात या लोकांनाही इतर प्रकल्पांप्रमाणे संघर्ष करावा लागतोय का? याचीही धास्ती त्यांना आहे. दरम्यान, सातारा तालुक्यातील टोळेवाडी गावात मुख्य रस्ता खचल्याने सध्या दळणवळण ठप्प झाले आहे.
१७ गावांतील लोक निवाऱ्यासाठी शेडमध्ये
पाटण, सातारा, जावळी या तालुक्यांतील स्थलांतरित कुटुंबांसाठी तात्पुरत्या स्वरुपात निवारा शेड उभारण्यात आलेली आहेत. हक्काचे घर सोडून हे लोक आता सार्वजनिक ठिकाणी संसार थाटून उमेदीने जगण्याचा प्रयत्न करत आहेत. पाटण तालुक्यातील सवारवाडी, पाबळवाडी, बोरगेवाडी, कळंबे, मसगुडेवाडी, भैरेवाडी, केंजळवाडी. सातारा तालुक्यातील टोळेवाडी, मोरेवाडी तसेच भैरवगडअंतर्गत चार वाड्या. जावळी तालुक्यातील रांजणी, नरफदेव, मोरघर या गावांतील आपत्तीग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात निवारा शेड उभारण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
ज्या गावात आमच्या पिढ्यान्पिढ्या वाढल्या. ज्या अंगणात आमची मुले-बाळे खेळली, ती गावपंढरी आम्हाला आता सोडावी लागणार आहे. उशाशी असलेला डोंगर कधीही कोसळू शकतो, या भीतीच्या सावटाखाली आम्ही सुखाने कसे जगू शकू ?
- संभाजी कदम, पूरग्रस्त
-----------------------------------
पाटण तालुक्यातील जिमनवाडी, महारवंड, बाटेवाडी या गावांवर खचलेल्या डोंगराचा धोका कायमचा बनला आहे. मी स्वत: या गावांत वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. त्यांचे हाल पाहिले. लोकांची पुनर्वसनाची मागणी असल्याने तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
- श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी