काळोशीच्या डोक्यावर शिळांचा ‘काळ’

By admin | Published: July 29, 2015 11:21 PM2015-07-29T23:21:58+5:302015-07-30T00:29:32+5:30

ग्रामस्थांची पुनर्वसनाची मागणी : वर्षभरानंतरही गावावरील संकटाची परिस्थिती ‘जैसे थे’

The 'time' of the rocks on the head of the blacksmith | काळोशीच्या डोक्यावर शिळांचा ‘काळ’

काळोशीच्या डोक्यावर शिळांचा ‘काळ’

Next

प्रगती जाधव-पाटील -सातारा -वाघजाई देवीच्या छत्रछायेखाली वसलेल्या परळी खोऱ्यातील काळोशी गावावर चार भल्या मोठ्या शिळा काळ म्हणून उभ्या राहिल्या आहेत. गतवर्षी माळीणच्या घटनेनंतर ‘लोकमत’ने लक्ष वेधले आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी येथे जुजबी पाहणी केली. मात्र, वर्षभरात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे धक्कादायक चित्र एक वर्षाने पाहायला मिळाले.
परळी खोऱ्यातील काळोशी हे अडीचशे उंबऱ्यांचे गाव. सुमारे बाराशे लोकसंख्या असणाऱ्या या गावाच्या उत्तरेस यवतेश्वर गाव डोंगरमाथ्यावर वसले आहे. त्या डोंगराचा काही भाग ढिसाळ झाला असून, तो दिवसेंदिवस सुटत चालला आहे. त्यापासून गावात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बरेचसे छोटे-मोठे दगड खाली येऊन गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या ओढा किंवा कडे-कपारीत येऊन अडकले आहेत. मात्र, त्यामुळे काही मोठ्या प्रमाणावर नुकसान अथवा हानी झाली नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून या डोंगरावरील काही शिळा निसटण्याच्या अवस्थेत आहेत. खूप वर्षांपूर्वी हा दगड गावावर कोसळणार होता. पण गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी वाघजाई देवी प्रकटली. देवीने हा दगड हाताने अडविला. तेव्हापासून कितीही मोठ्ठा पाऊस असला तरीही या शिळा तसूभरही हालल्या नाहीत, अशी ग्रामस्थांची भाबडी श्रद्धा आहे. या दगडावर वाघजाई देवीच्या हाताचा पंजा दिसत असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. काळोशी गाव तीव्र उतारावर वसले आहे. या गावातील ९० टक्के चाकरमानी मुंबईस्थित आहेत. लहरी पावसाच्या जिवावर येथील शेती फुलते. त्यामुळे दिवसभर गावात ज्येष्ठ आणि लहानग्यांचा वावर अधिक असतो. या डोगरावरील शिळा गेल्या काही वर्षांत निसटू लागल्या आहेत. जोरदार पाऊस सुरू झाला तर अनेक मोठे दगड कपारीतून ओघळून खाली देवीच्या मंदिरापर्यंत आले आहेत.
डोंगरावरील निसटलेल्या अवस्थेत असलेल्या शिळा एका जोरदार पावसाच्या सरीत कोसळण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. मोठ्या पावसाने जर या शिळा खाली आल्या तर तीव्र उतार आणि जडत्वाच्या नियमानुसार अतिवेगाने या शिळा अवघ्या गावावर वरवंटा फिरवून पुढे जाऊ शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. देवीवर अपार श्रध्दा असलेले येथील ग्रामस्थ आजही ‘देवी आमच्यावर संकट येऊ देणार नाही,’ हे खूप आत्मविश्वासाने सांगतात. पण, निसर्गाने रौद्ररूप धारण केले तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही, हेही ग्रामस्थांच्या अंतमर्नात कोरलेले आहे.


काय व्हायला हवे...
काळोशी गावाच्या डोंगरावरील शिळा कोणत्याही मोठ्या पावसाने कोसळू शकतात. त्यामुळे येथे तज्ज्ञांच्या सल्ल्याने कार्यवाही होणे आवश्यक आहे. तातडीने निधी उपलब्ध करून प्रशासनाने शिळांमधील वाढत चाललेल्या फटींमध्ये काँक्रिटीकरण करून वरून जाळी बसविणे अपेक्षित आहे. तसेच देवळाच्या वरील बाजूस संरक्षक जाळी बसविण्याचीही मागणी आहे.
काय झाले वर्षभरात...
पुणे जिल्ह्यातील माळीण येथील दुर्घटना घडल्यानंतर ‘लोकमत’ने जिल्ह्यातील काही गावांची पाहणी केली होती. सातारा तालुक्यातील काळोशी हे गाव धोक्याच्या सावटाखाली होते. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासनाने दोन अधिकारी पाठवून पाहणी केली. त्यानंतर वर्षभरात येथे काहीही झाले नाही.

रात्रीच्या वेळी पाऊस सुरू झाल्यानंतर खूप भयंकर आवाज येतो. जोराच्या पावसाच्या रेट्यात कधी एखादा छोटा दगड खाली गडगडत आला तरीही त्याचा अत्यंत भीषण आवाज येतो. या आवाजाने गावकरी भयग्रस्त होतात.
- अमोल निकम, अध्यक्ष, तंटामुक्त समिती

काळोशीच्या डोंगरावरील चार शिळा कोणत्याही क्षणी गावावर येऊ शकतात. प्रशासनाने गावाचे पुर्नवसन करावे; अन्यथा या शिळांना जाळी बसवून त्यांना खाली येण्यापासून अडविणे आवश्यक आहे.
- सोमनाथ पवार, पं. स. सदस्य

गावावरील हे डोंगरी संकट दूर करण्यासाठी आम्ही प्रशासनाला लेखी कळविले आहे. पण त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. या शिळांमुळे अवघ्या गावाला जिवाचा धोका आहे.
- यशवंत निकम,
सरपंच

Web Title: The 'time' of the rocks on the head of the blacksmith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.