टोल माफिसाठी वेळे ग्रामस्थांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:54 PM2020-01-08T18:54:13+5:302020-01-08T18:55:55+5:30
संपूर्ण पुणे ते सातारा महामार्गात वेळे गावच्या शेतकऱ्यांची बहुतांश जमीन यापूर्वीच्या रस्ता चौपदरीरणाच्या वेळी महामार्गासाठी गेली आहे. तसेच आता नव्याने होणाऱ्या सहापदरीकरण व नवीन दोन खंबाटकी बोगद्यास देखील वेळे येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन संपादित झाली आहे. त्यामुळे या महामार्गासाठी लागणाऱ्या एकूण जमिनिपैकी वेळे गावच्या जमिनीचे प्रमाण जास्त आहे.
वेळे - सातारा
पुणे ते सातारा महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर वेळेकर ग्रामस्थांना टोल मधून सवलत मिळावी म्हणून वेळे ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. वेळे परिसरातील कवठे, सरुर, केंजळ, शेंदूरजणे तसेच कोरेगाव तालुक्यातील काही गावांना टोल मध्ये सवलत मिळाली परंतु वेळे गाव या सवलतीपासून वंचित राहिले. त्यामुळे वेळेकर ग्रामस्थ संतापले आहेत.
संपूर्ण पुणे ते सातारा महामार्गात वेळे गावच्या शेतकऱ्यांची बहुतांश जमीन यापूर्वीच्या रस्ता चौपदरीरणाच्या वेळी महामार्गासाठी गेली आहे. तसेच आता नव्याने होणाऱ्या सहापदरीकरण व नवीन दोन खंबाटकी बोगद्यास देखील वेळे येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन संपादित झाली आहे. त्यामुळे या महामार्गासाठी लागणाऱ्या एकूण जमिनिपैकी वेळे गावच्या जमिनीचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच महामार्गासाठी वेळे ग्रामस्थांचे योगदान हे खूप मोठे आहे. असे असूनही येथील ग्रामस्थांना न्याय मिळत नाही.
वेळे हे गाव वाई तालुक्यात मोडते. गावालगत अगदी 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सुरूर गावाला टोल मध्ये सवलत मिळते. सुरूर पासून वाई रस्त्यावर सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेंदूर जणे गावाला टोल मध्ये सवलत मिळते पण वेळे गाव अगदी महामार्गावर असून देखील ते या टोलमाफी पासून वंचित कसे काय राहते? असा सामान्य प्रश्न वेळेकर नागरिक विचारत आहेत. येथील नागरिकांना दररोज जिल्ह्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी जावे लागते. परंतु आनेवाडी टोलनाक्यावर सवलत मिळत नसले कारणाने त्यांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. अनेकदा त्यामुळे वाद देखील होत असतात.
वेळे गावाचे योगदान पाहता येथील नागरिकांना टोल मधून सवलत मिळालीच पाहिजे यासाठी येथील ग्रामस्थांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांना विनंती देखील करण्यात आली होती. परंतु या विनंतीला केराची टोपली दाखवण्यात आली. पुणे ते सातारा महामार्गासाठी सर्वात जास्त क्षेत्र हे वेळे येथील ग्रामस्थांनी दिले आहे. तरीदेखील त्यांचेवर घोर अन्याय होताना दिसत आहे.
येत्या काळात जर वेळे ग्रामस्थांना आनेवाडी येथील टोल नाक्यावर टोल माफी झाली नाही तर येथील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्याचा तयारीत आहेत. येणाऱ्या ग्रामसभेत तसा ठराव करून त्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तरी महामार्ग प्रशासनाने वेळे गावाची वेळेवर दखल घेऊन तात्काळ येथील ग्रामस्थांना टोल माफी करून त्यांना न्याय द्यावा. अन्यथा संपूर्ण गाव रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.
वेळे गावाचे महामार्गासाठीचे योगदान हे खूप मोठे आहे. येथील ग्रामस्थांना अनेकवेळा कोणत्याही कारणाने जिल्ह्याच्या ठिकाणी जावेच लागते. परंतु चार आण्याच्या कोंबडीसाठी बारा आणे वाया घालवावे लागतात, हे थांबले पाहिजे. आमच्या वेळे गावाला संपूर्ण टोल माफी झालीच पाहिजे.
-- सुरेश अंकुश पवार, ग्रामस्थ, वेळे.
जिल्ह्याच्या ठिकाणी आठवड्यातून किमान एकदा तरी चेकपसाठी दवाखान्यात जावेच लागते. परंतु टोल मुळे आम्हाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. टोल माफी मिळत नसलेने आम्ही संतप्त झालो आहोत. आम्हाला टोल माफी मिळाली पाहिजे.
विजय पवार, ग्रामस्थ, वेळे