मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी साताऱ्यात १३ एप्रिलला ‘मानवी साखळी’चे आयोजन
By नितीन काळेल | Published: April 8, 2024 07:12 PM2024-04-08T19:12:59+5:302024-04-08T19:13:10+5:30
सातारा : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून आता १३ एप्रिलला ’मानवी साखळी’ ...
सातारा : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून आता १३ एप्रिलला ’मानवी साखळी’ तयार करुन आवाहन करण्यात येणार आहे. यामध्ये तरुण, खेळाडू, नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. हा उपक्रम सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे. यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. तसेच माढा लोकसभा मतदारसंघातही सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. यासाठी मतदारांत जनजागृती केली जात आहे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी १३ एप्रिलला सकाळी ७ ते ९ या वेळेत जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी ‘मानवी साखळी’चे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये तरुणवर्ग, खेळाडू, महाविद्यालयीन विद्याऱ्थी, स्वयंसेवक, शासकीय-निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, सर्व वयोगटातील नागरिक आदींचा सहभाग घेण्यात येणार आहे.
या मानवी साखळीत भारताचा नकाशा तयार करण्यात यावा अशा सूचना आहेत. तसेच भारताचा नकाशा तयार करताना मानवी साखळीच्या दोन ओळी असाव्यात. यामध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वजच्या तिरंगामधील रंगाचा वापर करावा. प्रत्येक व्यक्तीने पांढरा शर्ट घातलेला असावा, संपूर्ण नकाशाभोवती चारही बाजुंनी विद्याऱ्श्यांच्या निळ्या रंगाच्या टोप्या घातलेल्या एक ओळीने चाैरस तायार करावा, अशा काही सूचना करण्यात आलेल्या आहेत.
तालुक्याच्या ठिकाणी एकाचवेळी आयोजन..
दि. १३ एप्रिलला सर्व तालुक्याच्या ठिकाणी सकाळी बरोबर साडे आठ वाजता एकाचवेळी ‘मानवी साखळी’चे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या ठिकाणी माईक, स्पीकर, मंडप, ड्रोन कॅमेरा, पिण्याचे पाणी आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमावेळी ढोल-ताशा पथक, कलापथक, मतदार जागृतीबाबत बलून सोडणे आदींचेही नियोजन करण्यात येणार आहे.