कोरोनाला हरविण्यासाठी तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:42 AM2021-04-28T04:42:22+5:302021-04-28T04:42:22+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनाची भीती घालविण्यासाठी लसीकरणाकडे नागरिकांचा ओढा आहे. खंडाळा ग्रामीण रुग्णालयासह ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनाची भीती घालविण्यासाठी लसीकरणाकडे नागरिकांचा ओढा आहे. खंडाळा ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी तोबा गर्दी होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे पालन होत नसल्याने या गर्दीतूनच कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खंडाळा तालुक्यातील सर्वच गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य व महसूल विभागासह सर्वच शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे.
प्रशासन जीव तोडून काम करत असतानाही रुग्ण वाढतच आहेत. याला आळा घालण्यासाठी लसीकरण मोहीम उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी ग्रामीण रुग्णालयासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून लसीकरणाची मोहीम सुरू आहे. खंडाळा ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. तरीही लोक तासन्तास रांगेत उभे राहून लस घेत आहेत.
कोणतीही काळजी न घेता नागरिक रांगेत रेलचेल करीत असतात. त्यामुळे प्रशासनावरही मोठा ताण येत आहे. खंडाळा येथील लसीकरण केंद्रावर मदतीसाठी आणखी कर्मचाऱ्यांची नेमणूक होणे गरजेचे आहे.
खंडाळा तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या हजार पार झाली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराचा खर्च भागवणे सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही. त्यामुळे लस घेऊन सुरक्षित राहण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मात्र, लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने लस घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे; परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रांगेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे.
चौकट :
कर्मचारी पुरवण्याची गरज
लोणंद, अहिरे, शिरवळ येथील लसीकरण केंद्रांवर मदतीसाठी शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. मात्र, खंडाळा ग्रामीण रुग्णालयातील केंद्रावर येथीलच स्टाफवर सर्व व्यवस्था अवलंबून आहे. लसीकरण मोहीम अधिक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी येथे वाढीव कर्मचारी देणे गरजेचे आहे.
फोटो : दशरथ ननावरे यांनी मेल केला आहे.