आजपासून जिल्ह्यात ‘माउली’चा जयघोष लोणंदमध्ये

By admin | Published: July 4, 2016 10:32 PM2016-07-04T22:32:41+5:302016-07-05T00:33:12+5:30

एकच मुक्काम : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा; चार दर्शन रांगा, नगरपंचायतीकडून उपाययोजना

Today, the 'Mauli' in the district is in Lonand | आजपासून जिल्ह्यात ‘माउली’चा जयघोष लोणंदमध्ये

आजपासून जिल्ह्यात ‘माउली’चा जयघोष लोणंदमध्ये

Next

  लोणंद : ‘संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. ५ रोजी सायंकाळी जिल्ह्यात प्रवेश करत आहे, तसेच एक दिवसाच्या मुक्कामासाठी लोणंद नगरीमध्ये दाखल होत आहे. पालखी सोहळा स्वागताची लोणंद नगरपंचायतीने पूर्ण तयारी केली आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणंद नगरी सज्ज झाली आहे,’ अशी माहिती नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी दिली. दरम्यान, यावर्षी लोणंदमध्ये पालखीचा एकच मुक्काम आहे. त्यामुळे भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे चार दर्शन रांगा करण्यात येणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे पांडुरंगाच्या भेटीसाठी दरमजल करत निघाला आहे. मंगळवारी एक दिवसाच्या मुक्कामासाठी लोणंदनगरीमध्ये येत आहे. लोणंद नगरपंचायत व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांची व भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या वतीने पालखी तळावर नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई केली असून, पालखीतळ धोबी घाटावर स्नान व धुण्यासाठी मुबलक पाण्याची व्यवस्था आहे. सार्वजनिक पाण्याचे नळाचे स्टॅण्डपोस्ट काढण्यात आले आहेत. पालखी तळावर मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. सर्वत्र पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्व लाईनची गळती काढण्यात आली आहे. इलेक्ट्रिक मोटर्स सुस्थितीत ठेवण्यात आल्या आहेत. पर्यायी मोटर्स पण ठेवण्यात आल्या आहेत. पाडेगाव पाणीपुरवठा केंद्र व इतर ठिकाणी टँकर भरण्याची सुविधा आहे. दिंड्या उतरण्याच्या ठिकाणी ४० सार्वजनिक नळ उभारण्यात आले आहेत. गावामध्ये असणारी सार्वजनिक शौचालये साफ करण्यात आली असून, अंतर्गत असणारी गटारे स्वच्छ करण्यात आली आहेत. पाणी साठवण्याच्या ठिकाणी मुरूम टाकण्यात आला आहे व सर्व रोड लाईटची दुरुस्ती करून नवीन ट्यूब लाईट बसविण्यात आल्या आहेत. विभागांवर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या असून, त्यांच्या नावाची व फोन नंबरच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या साह्याने वारकऱ्यांसाठी मोफत दवाखाना पालखी काळात सुरू करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. ५ जुलैला सायंकाळी ५ वाजता पालखी सोहळ्याचे नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके व सर्व नगरपंचायत सदस्य, कर्मचारी स्वागत करणार आहेत. पालखी आगमनानंतर सार्वजनिक पंगतीच्या ठिकाणी नगरपंचायत कर्मचारी स्वच्छतेचे काम करणार आहेत. जलकुंभ व टँक निर्जंतुक करण्यात आले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले असून, संपूर्ण लोणंद शहर व वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यास अडथळा ठरणारी झुडपे काढण्यात आली आहेत. या रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले आहेत. तसेच महत्त्वाच्या नंबरचे फ्लेक्स बोर्ड बनविण्यात आले आहेत. पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी आरोग्य विभागानेदेखील लोणंद व पाडेगाव या दोन्ही गावांतील सर्व्हे केला असून, गावातील डासाचा नायनाट करण्यासाठी धूर फवारणी करण्यात आली आहे. पाण्याच्या टाक्या भरलेल्या आहेत. त्याठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील २० विहिरी निश्चित करून त्याठिकाणी पाणी निर्जंतुक करण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. वारकऱ्यांना वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून तीन वैद्यकीय केंद्रे तयार करून २४ तास सेवा मिळेल याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील सर्व हॉटेल व मिठाई व्यावसायिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासकीय विश्रामगृहाचीही स्वच्छता करण्यात आली आहे. (वार्ताहर) पोलिस दल बंदोबस्तासाठी सज्ज... संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यावर बंदोबस्तासाठी पोलिसदल देखील सज्ज आहे. बंदोबस्तासाठी १ अप्पर पोलिस अधीक्षक, ४ पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस, होमगार्ड पालखी सोहळ्यामध्ये नेमण्यात आले आहेत. पालखी सोहळ्याचा यावर्षी एकच मुक्काम असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेऊन बाबंूच्या साह्याने चार दर्शनरांगा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुरुषांसाठी दोन रांगा व महिलांसाठी दोन रांगा असणार आहेत.

Web Title: Today, the 'Mauli' in the district is in Lonand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.