मांढरगडावर भरणार आज भक्तांचा मेळा
By admin | Published: January 22, 2016 11:49 PM2016-01-22T23:49:06+5:302016-01-23T00:53:51+5:30
यात्रेस प्रारंभ : शासकीय यंत्रणा सज्ज; भाविकांच्या सेवेसाठी तब्बल ६३ एसटी बसेस : वाई शहरातील वाहतुकीत बदल
मांढरदेव : महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळुबाई देवीच्या यात्रेस शनिवारी (दि. २३) पासून प्रारंभ होत आहे. यात्रेचा मुख्य दिवस असल्याने मांढरगडावर भक्तांचा सोहळा रंगणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार देवस्थान समिती, ग्रामपंचायतीने यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी नेटके नियोजन केले आहे.
मांढरदेव, ता. वाई येथे दि. २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या श्री काळुबाई मांढरदेवी यात्रा निमित्ताने महाराष्ट्रातून तसेच शेजारील राज्यातून विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी खासगी वाहनाने तसेच एसटी-बसने येत असतात. यामुळे वाई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. याकरिता मुंबई पोलीस अधिनियम कलम ३३ (१) (ब) नुसार वाई शहरातील वाहतुकीसंबंधीचे पुढील आदेश दि. २२ जानेवारी ते दि. ९ फेब्रुवारी या कालावधीकरिता डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सातारा यांनी जारी केले आहेत.
साताराकडून मांढरदेवकडे येणारी सर्व वाहने पाचवड ते वाई येथील भीमनगर तिकाटणे येथून वाई शहरात न येता उजवीकडून शहाबागफाटा-वाई-सुरुर रोडने एमआयडीसी बायपास रोडमार्गे बोफर्डी ते मांढरदेवकडे जातील.
जोशी विहीरकडून येणारी वाहने वाई शहरात न येता वाठार फाटा येथून उजवीकडे वळून वाई-सुरुर रोडने एमआयडीसी बायपास रोड मार्गे बोफर्डी ते मांढरदेवकडे जातील.
पुणे-सुरुर मार्गे येणारी वाहने वाई शहरात न येता एमआयडीसी बायपास रोड मार्गे बोफर्डी ते मांढरदेवकडे जातील. वाई शहरातील वाहनांसाठी जाणारा मार्ग किसनवीर चौक - पी. आर. सायकल मार्ट- ग्रामीण रुग्णलय - दातार हॉस्पिटल - चावडी चौक - सूर्यवंशी चौक ते एमआयडीसी मांढरदेव. तर येण्याचा मार्ग एमआयडीसी मार्गे सूर्यवंशी चौक-जामा मशिद ते पी. आर. चौक -किसनवीर चौक.
वरील नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कारवाईस पात्र राहतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
वाई तालुक्यातील मांढरदेव येथे पौष पौर्णिमेला भरणाऱ्या मांढरदेवी काळुबाईच्या यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या सातारा विभागाने ६३ बस सज्ज ठेवल्या आहेत.
मांढरदेव येथील काळुबाईची यात्रा दर वर्षी मोठ्या प्रमाणात भरते. राज्यातून मोठ्या संख्येने भाविक यात्राकाळात दर्शनाकरिता येतात. यात्रेला येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांची सोय व्हावी, या हेतूने संबंधित प्रशासन जय्यत तयारी करत असते. तद्वत एसटी महामंडळही सज्ज झाले आहे. भाविकांची मांढरदेवी गडापर्यंत येण्या-जाण्याची अडचण होऊ नये, या उद्देशाने सातारा विभागातून एकूण ६३ बसच्या फेऱ्यांची सोय केली आहे. त्यासाठी सातारा आगारातून तीन, कोरेगाव पाच, कऱ्हाड पाच, फलटण आठ, वाई पंधरा, पाटण तीन, दहिवडी तीन, महाबळेश्वर सहा, खंडाळा दहा व मेढा पाच अशा ६३ बस मागविण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती खंडाळा आगारप्रमुख एस. बी. फरांदे यांनी दिली. या बस २३ जानेवारी या यात्रेच्या मुख्य दिवशी सातारा, कऱ्हाड, स्वारगेट, फलटण, लोणंद वाठार स्टेशन, सुरुर, पाचवड, जोशीविहीर आदी ठिकाणावरून दिवसभर ये-जा करणार आहेत. भाविकांनी सुरक्षित प्रवास म्हणून एसटी बसनेच प्रवास करावा, असे आवाहन खंडाळा आगारप्रमुख फरांदे, वाईचे आगारप्रमुख वामनराव जाधव व साताऱ्याच्या गिरी यांनी केले
आहे. (वार्ताहर)
प्रशासन सज्ज आज देवीची महापूजा
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बंदोबस्ताकामी नेमलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना यात्रा काळात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ चे अधिकार प्रदान केले आहेत.
जिल्हा मुख्य न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांच्या हस्ते दि. २३ रोजी देवीची महापूजा व महाआरती होणार आहे. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार अतुल म्हेत्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, देवस्थानचे विश्वस्थ अॅड. मिलिंद ओक, अतुल दोशी, अॅड. महेश कुलकर्णी, सोमनाथ गुरव, रामदास गुरव, मारुती मांढरे, सतीश मांढरे, सुनील मांढरे, लक्ष्मण चोपडे उपस्थित राहणार आहेत.
आपत्ती व्यवस्थापन साठी हेलिपॅड
भाविकांची गर्दी लक्षात घेऊन व मागील दुर्घटनेची पार्श्वभूमी पाहता यात्रेत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रथमच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मांढरदेव येथे हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. गरज भासल्यास हेलिकॉप्टरच्या मदतीने सेवा उपलब्ध केली जाणार आहे.